‘जग्गु आणि ज्युलिएट’ 10 फेब्रुवारीस प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

‘जग्गु आणि ज्युलिएट’ 10 फेब्रुवारीस प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘होतोय राडा दमदार… येतोय भावी आमदार’ यासारख्या गीतांवर थिरकायला लावणारी भन्नाट गिते तर तरुणाईचा मनाचा ठाव घेणारे… तर ‘कधी तुला सांगूनही कळले नाही…’ अशा गीतांनी तरुणाईवर अधिराज्य गाजवत असलेल्या ‘जग्गु आणि ज्युलिएट’ या मराठी चित्रपटातील कलाकार व संगीतकार अजय-अतुल यांच्या भेटीने कोल्हापूरकरांच्या उत्साहाला उधाण आले. कोल्हापुरात दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या महिलांबरोबर अभिनेता अमेय वाघ व अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनाही थिकरण्याचा मोह आवरला नाही. संजय घोडावत विद्यापीठ तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात या कालाकारांच्या भेटीने तरुणाईने जल्लोष केला.

संपूर्ण महाराष्ट्रात पुनीत बालन यांची निर्मिती असणारा आणि महेश लिमये यांनी दिगदर्शित केलेला ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा मराठी चित्रपट दि. 10 फेब्रुवारीस प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटाचे निर्माता पुनीत बालन, दिग्दर्शक महेश लिमये, अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी, संगीतकार अजय-अतुल यांची जोडी कोल्हापूरकरांच्या भेटीला आली. यावेळी कोल्हापूरकरांच्या प्रेमाने हे सर्व कलाकार भारावून गेले.

जग्गु आणि ज्युलिएट

…अन संजय घोडावत यांनीही ठेका धरला

संजय घोडावत विद्यापीठात ‘जग्गु आणि ज्युलिएट’ च्या टीमने दुपारी भेट दिली. यावेळी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गीतांवर तरुणाईने भन्नाट नृत्य केले. विशेषत: ‘होतोय राडा दमदार… येतोय भावी आमदार’ या गीतावर अमेय व वैदेही यांनी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनाही नृत्य करायला भाग पाडले. तेव्हा तरुणाईने एकच जल्लोष केला. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंडे उपस्थित होते.

जग्गु आणि ज्युलिएट

रसिकांची दाद झणझणीत

कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जसा झणझणीत तशी कोल्हापूरकरांची चित्रपटाला मिळणारी दादही झणझणीत असते, असे अभिनेता अमेय वाघ याने सांगून डॉ. वाय. पाटील कॉलेजमधील तरुणाईची मने जिंकली. मनाचे ठाव घेणारे हे गीत येणार्‍या ‘व्हेलेंटाईन डे’ला गाजणार अशी घोषणा देत तरुणाईने ‘जग्गु आणि ज्युलिएट’ चित्रपटाच्या टीमचे जल्लोषी स्वागत केले.

कोल्हापूरची खासियत काय, असे विचारता अमेय वाघ यांनी कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा झणझणीत तशी कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांची दादही झणझणीत असते, असे सांगताच तरुणाईतून आवाज घुमला…‘एकच वाघ अमेय वाघ’ यावेळी अमेय याने कोल्हापुरात या चित्रपटाचे प्रमोशन होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पहावा असे, आवाहन केले.

यावेळी डी. वाय. पाटील कॉलेजचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, श्रीलेखा साटम, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संतोष जेडे, पॉलिटेक्निकचे, प्राचार्य महादेव नरके, डॉ. नितेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राहुल पाटील यांनी टीमचे स्वागत केले.

जग्गु आणि ज्युलिएट

‘कस्तुरी’ने केले जल्लोषी स्वागत

दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या महिलांच्या भेटीसाठी ‘जग्गु आणि ज्युलिएट’ची टीम व्ही. टी. पाटील सभागृहात आली. तेव्हा महिला सभासदांनी जल्लोषात टीमचे स्वागत केले. अनेकांना कलाकार तसेच संगीतकार अजय-अतुल यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. अजय-अतुल यांनीही येथील महिलांशी दिलखुलास संवाद साधला.

दिग्दर्शक महेश लिमये यांनी तरुणाईची जुळणारी मने याचे सुरेख चित्रण चित्रपटात करण्यात आल्याचे सांगितले. संगीतकार अजय गोगावले यांनी संगीताची वेगवेगळी भाषा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. अतुल गोगावले यांनी आपल्या प्रत्येकात असणार्‍या ‘जग्गु व ज्युलिएट’ची आठवण होणार आहे, असे सांगून आगामी 14 फेब्रुवारी व्हेलेंटाईन डे जग्गु आणि ज्युलिएट चित्रपटाबरोबर उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले.

जग्गु आणि ज्युलिएट

 

चित्रपट गर्दी खेचणार!

‘पुनीत बालन स्टुडिओज’ची नवी कोरी निमिर्र्ती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादुई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘जग्गु आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात 10 फेब्रुवारीला आपल्या भेटीस येणार आहे. कोल्हापुरात या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्यानंतर अगदी घरी आल्यासारखे वाटते. येथील तरुणाईचा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून आणखी उत्साह वाढला आहे. कोल्हापुराच्या तांबड्या-पांढर्‍या रश्शसारखीच आमची ‘जग्गु आणि ज्युलिएट’ची जोडी आहे. व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरू आहे. तुम्ही कोणावर प्रेम केले असेल अथवा कोणावर तरी प्रेम होईल. त्यामुळे निश्चितच येत्या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या आमचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा चित्रपट पाहण्याला प्रेक्षकांची गर्दी खेचणार, असा ठाम विश्वास आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक, चित्रपट निर्माता

Back to top button