Turkey Earthquake : तुर्कीच्या मदतीसाठी भारत सरसावला, पीएम मोदींनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय | पुढारी

Turkey Earthquake : तुर्कीच्या मदतीसाठी भारत सरसावला, पीएम मोदींनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कस्तानला मदत पाठवण्यासाठी भारत आपले वैद्यकीय आणि बचाव पथक पाठवणार असल्याचे सांगितले. भूकंपानंतरच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने पीएमओमध्ये बैठक पार पडली. यात 100 सदस्यीय एनडीआरएफचे पथक आणि वैद्यकीय मदत साहित्यही तुर्कस्तानला पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा येणा-या कालावधीत वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपत्तीग्रस्त तुर्कस्तानला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. पीएम मोदी म्हणाले, तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या मृत्यू आणि मालमत्तेच्या हानीमुळे दुःखी झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांना मी दु:ख समजू शकतो. हा त्यांच्यासाठी कठीण काळ आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो. भारत तुर्कस्तानच्या नागरिकांसोबत एकजुटीने उभा आहे. या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे मनोगत व्यक्त केले आहे.

तुर्की सरकारच्या समन्वयाने एनडीआरएफची शोध आणि बचाव पथके तसेच मदत सामग्रीसह वैद्यकीय पथके तातडीने पाठवली जातील. विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह 100 एनडीआरएफ जवानांची दोन पथके भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज झाली आहेत, अशी माहिती पीएमओने दिली आहे.

Back to top button