औरंगाबाद : अवैध गर्भपात प्रकरणी चितेगाव येथील रुग्णालय सील, डॉक्टर फरार | पुढारी

औरंगाबाद : अवैध गर्भपात प्रकरणी चितेगाव येथील रुग्णालय सील, डॉक्टर फरार

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका स्त्री रूग्णालयात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस आणि वैद्यकीय विभागाने छापा टाकून हे प्रकरण उघडकीस आणले. या छाप्यात संशयास्पद यंत्रसामग्री जप्त करून रुग्णालय सील केले. या प्रकरणी डॉ. सुनील उद्धव काळकुंबे (रा.अंतरवाली सिंदखेडा ता.जि. जालना) व अमोल जाधव (रा. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी कामगारांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चितेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या गर्भपात केले जात होते. येथे गर्भपात केलेल्या बुलढाणा येथील एका महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर येथील डॉक्टर फरार झाले. बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांनी वैद्यकीय पथकासोबत शनिवारी (दि.४) रात्री रुग्णालयावर छापा टाकला. छाप्यात गर्भपात करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री जप्त करून रुग्णालय सील केले.

Back to top button