पुण्यातील ‘कसबा पेठ’ पोटनिवडणूक बिनविरोध करा, भाजपचे विरोधकांना पत्र | पुढारी

पुण्यातील ‘कसबा पेठ’ पोटनिवडणूक बिनविरोध करा, भाजपचे विरोधकांना पत्र

पुढारी ऑनलाईन: कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्व पक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून केले आहे.

मुळीक म्हणाले, देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. विकासकामात राजकारण केले जात नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसेच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते.’

मुळीक पुढे म्हणाले, ही परंपरा कायम राखीत कसबा पेठ मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. बिनविरोध निवडणूक करणे हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भाजप आणि मित्रपक्षांनी अंधेरीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार दिला नाही. तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नाही. कसबा मतदारसंघात ही परंपरा कायम ठेवावी, असे या पत्रात मुळीक यांनी म्हटले आहे.

पुणे भाजपच्या या आवाहनला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रतिसाद देणार का येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. परंतु, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आले आहेत. राज्यातील पंढरपूर, कोल्हापूर येथील पोटनिवडणूका या भाजपने बिनविरोध केली नसल्याचे दाखले महाविकास आघाडीने दिले आहेत.

Back to top button