प्रेमासाठी वाटेल ते ! फेसबुकवर भेटलेल्या बॉयफ्रेंडसाठी पठ्ठीने पोहत ओलांडली देशाची सीमा | पुढारी

प्रेमासाठी वाटेल ते ! फेसबुकवर भेटलेल्या बॉयफ्रेंडसाठी पठ्ठीने पोहत ओलांडली देशाची सीमा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे या गयी… हे गाणं आपण प्रत्येकाने ऐकलं असेल. पण एका पठ्ठीने मात्र हे अगदी शब्दश: खरं करून दाखवलं. प्रेमासाठी, प्रेमात वाटेल ते करणाऱ्या व्यक्तीच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकतो. पण एका बांग्लादेशी युवतीने मात्र प्रेमासाठी अचाट धाडस केलं आहे. केवळ २२ वर्षं वय असलेली ही युवती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कृष्णा मंडल असं या तरुणीचं नाव आहे. बांग्लादेशमधील कृष्णाची ओळख फेसबूकच्या माध्यमातून भारतातील अभिक मंडल यांच्याशी झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन लग्न करण्याच्या शपथा घेऊनही झाल्या. पण आडवी आली ती दोन देशांची सीमा. कृष्णाकडे भारतात येण्यासाठी पासपोर्ट नव्हता. प्रेमात आकंठ बुडालेल्या कृष्णाने मग मात्र धाडसी मार्ग निवडला.

भारतात येण्यासाठी तिने सगळ्यात पहिल्यांदा पार केलं ते बंगाली वाघांचं वसतिस्थान असलेलं सुंदरबन. त्यानंतर जवळपास एक तासाहून अधिककाळ पोहत तिने भारताचा काठ गाठला. तीन दिवसांपूर्वी भारतात आलेल्या कृष्णाचं तीन दिवसांपूर्वी कोलकाता येथील कालीघाटमध्ये अभिकशी लग्न झालं. त्यानंतर मात्र पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.

या लवस्टोरीचं पुढे काय होणार ?

सोमवारी पोलिसांनी कृष्णाला देशात अवैध एंट्री केल्याबाबत ताब्यात घेतलं आहे. आता तिला बांग्लादेशी हाय कमिशनच्या ताब्यात दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

असंच काहीसं यापूर्वीही घडलं आहे…

इमान हुसैन नावाचा एक मुलगा चॉकलेटसाठी बॉर्डर क्रॉस करून इथे आला होता. स्थानिक पोलिसांनी त्याला कोर्टात दाखल केलं होतं. त्यावेळी त्याला कोर्टाने १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती.

Back to top button