भाजप-शिंदे शासन म्हणजे ‘स्थगिती सरकार’ : अजित पवारांचा टोला | पुढारी

भाजप-शिंदे शासन म्हणजे ‘स्थगिती सरकार’ : अजित पवारांचा टोला

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यवधींच्या विकासकामांना स्थगिती दिली. हे सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. आम्ही मागच्या सरकारमधील कामे थांबवली नव्हती, पण सध्या तोंड बघून कामे केली जात आहेत. 40 आमदारांमुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण सभागृह 288 आमदारांचे आहे. विरोधी आमदारांचीही कामे झाली पाहिजे. तरच राज्य पुढे जाईल. सत्ता येत असते जात असते हे काय ताम्रपट घेऊन आले काय? लोकांच्या मनामध्ये येईल तेव्हा सत्तेमध्ये बदल होईल. कोणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याचे काही चालत नाही. हा इतिहास आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, मंत्रिपदासाठी कर्तबगार महिला नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

धामणेर, ता. कोरेगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, माजी आयकर आयुक्त अरुण पवार, कांतीलाल पाटील, बाळासाहेब सोळस्कर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, सरपंच चंद्रकांत ओवाळे, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, अ‍ॅड. अशोक पवार, भागवत घाडगे, अंगराज कट्टे व मान्यवर उपस्थित होते.

आ. अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये बेकारी वाढत असताना लाखो युवकांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले. अगोदर म्हणाले बघतो नंतर म्हणाले, नवीन आणतो. तुम्ही कुठला प्रकल्प आणला, कशी बेकारी व महागाई कमी केली? महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही निर्णय घेतले. तसेच आरक्षण 50 टक्के केले. मात्र, यांची सत्ता येवून सहा महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. या सरकारला एकाही महिलेला मंत्री करावे, असे वाटत नाही. त्यांच्यात कर्तबगार महिला नाहीत का? असाही सवाल त्यांनी केला.

अजितदादा पुढे म्हणाले, त्यांना वाटायचे आपण दोघेच राज्याला उरून पुरू. पण जेवढी संख्या जास्त तेवढे चांगले काम होते. 36 जिल्हे व 20 मंत्री आहेत. एकेका मंत्र्याला 5 ते 6 जिल्हे दिलेत कसे काम होेणार? जेव्हा महापुरूषांची नावे घेत असतो तेव्हा त्यांचा आदर्श घेवून चालायचे असते. मात्र, आताचे सरकार त्याकडे लक्ष देत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले. त्यांच्या राज्यात अशी व्यवस्था. महापुरूषांचा अपमान करायचा, बेताल वक्तव्य करायचे. तुम्ही राज्याला कुठे घेवून चालला आहात. निवडून आलेले आमदार फुटायला लागले तर देशात स्थिरता राहील का? असा हल्लाबोलही अजितदादांनी केला.

आ. रामराजे म्हणाले, गावाचा विकास कसा केला जावू शकतो याचा आदर्श शहाजी क्षीरसागर यांनी घालून दिला. राष्ट्रपती, पंतप्रधान होता होईल मात्र, सरपंच होता येणे अवघड आहे. पण तरीही शहाजी क्षीरसागर यांनी 10 वर्ष सरपंच होण्याची किमया साधली त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. राज्य सरकार जे निर्णय घेत आहेत त्याचे सामान्यांवर परिणाम होत आहेत. याबाबत अजितदादांनी अधिवेशनात प्रश्न मांडावा. सध्या अजितदादा उभे राहतात व सत्ताधारी गप्प बसतात. अजितदादांनी सत्तेत विकासच केला. त्यांनी वेगळ्या प्रकारचा दरारा निर्माण केला. पवारसाहेबांनंतर दादांनी विकासकामांचा दरारा ठेवला. त्यामुळे विरोधकांना बोलायला जागा नव्हती.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजप यशस्वी झाले. सरकारसंदर्भात आज कोर्टात सुनावणी सुरू आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा हातात धरून तारखा वाढवण्याचे काम सुरू आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील प्रशासन सुस्त झाले असून त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. मंत्रिमंडळाच्या 22 ते 23 जागा रिक्त आहेत. त्या भरायला गेल्यास सत्ता जाईल या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे आमदारच आता मंत्रिमंडळ अमुक दिवशी होईल, असे सांगत आहेत. निर्णय घेतला जातो मात्र त्याची कार्यवाहीच होत नाही. राज्याचा आर्थिक समतोल बिघडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याला किती निधी मिळाला हे सांगितले जात नाही. अजितदादांनी जी आर्थिक शिस्त लावली होती ती शिस्त राहील का नाही, अशी शंका आ. पाटील यांनी उपस्थित केली.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शहाजी क्षीरसागर यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचलन विकास पवार, आभार उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी माजी सरपंच उत्तम क्षीरसागर, सागर साळूंखे, अंकुश गोसावी, प्रदीप क्षीरसागर, सुनील मलवडकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button