ओडिशात आरोग्यमंत्र्यांची हत्या | पुढारी

ओडिशात आरोग्यमंत्र्यांची हत्या

भुवनेश्वर, वृत्तसंस्था : ओडिशाचे आरोग्यमंत्री नभकिशोर दास यांच्यावर आज एका सहायक पोलिस उपनिरीक्षकानेच गोळ्या झाडल्या. दास कारमधून उतरताच या पोलिसाने अगदी जवळून त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. दास यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात बृजराजनगर येथे रविवारी दुपारी ही घटना घडली.

नभकिशोर दास हे एका कार्यक्रमासाठीबृजराजनगर येथे आले होते. गांधी चौक भागात त्यांचा ताफा दाखल झाला व दास कारमधून खाली उतरले. त्यांना स्वागतासाठी लोकांनी वेढा घातला असतानाच एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. एका पाठोपाठ एक अशा दोन गोळ्या झाडून तो पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडले. दास यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्याने ते रक्तबंबाळ होत खाली कोसळले. त्यांची शुद्ध हरपली.

लोकांनी पकडून दिले

उपविभागीय पोलिस अधिकारी गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले की, गोपाल दास असे त्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याला लोकांनी पकडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

हल्ल्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून बृजराजनगर भागात तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या घटनेचा धिक्कार केला असून प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपासून नभकिशोर दास तणावात होते. त्यांना कसली तरी भीती वाटत होती, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांना काही धमकी आली होती का, याचाही पोलिस तपास करीत आहेत.

शनी शिंगणापूर मंदिराला कोटीवर दानामुळे देशभर चर्चेत

दास यांनी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिराला 1.7 किलो सोने आणि 5 किलो चांदीने बनविलेले कलश दान केले होते. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते.

Back to top button