‘रशियन बच्चा’ रमला सिंधुदुर्गातील शाळेत; मराठी शिकण्याचे वेड | पुढारी

'रशियन बच्चा' रमला सिंधुदुर्गातील शाळेत; मराठी शिकण्याचे वेड

मळेवाड; पुढारी वृत्तसेवा : मिरॉन नावाचा रशियन मुलगा आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला. परंतु सध्या भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्गमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे. सद्यस्थितीत गावापासून शहरापर्यंत इंग्लिश मिडियम शाळांमधील मुलांची संख्या वाढत असून एक रशियन मुलगा चक्क जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता सातवीमध्ये मराठीचे धडे गिरवत आहे. या मुलाच्या आई-वडिलांना आणि मुलाला मराठी भाषा शिकण्याचे असलेले वेड आणि मराठी भाषेबद्दल निर्माण झालेली आपुलकीच त्यांना या शाळेपर्यंत घेऊन आली असून मिरॉन भारत-रशिया घट्ट मैत्रीची प्रचिती मिरॉन छोटा दूत बनून देत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव जिल्हा परिषदेच्या शाळा नं. १ मध्ये सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करत आहे. मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा मुलगा सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशियाहून आला. आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला. गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेत आहे. येथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे. महत्वाचे म्हणजे मिरॉनने स्वतः पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे.

शाळेतील सर्व शिक्षकसुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करत त्याला आवडीने शिकवतात. चार महिन्यानंतर तो रशियात परत जाणार आहे. पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन, असा विश्वास तो व्यक्त करत आहे. रशियन मुलगा मराठी शाळेत मराठीचे धडे गिरवत आहे, हे पाहिल्यावर इंग्रजी शाळांकडे मराठी मुलांना पाठवणाऱ्या आई-वडिलांच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारे ठरत आहे.

Back to top button