जम्मूमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी अमित शहांची : कुणाल राऊत | पुढारी

जम्मूमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी अमित शहांची : कुणाल राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील अनेक समस्यांचे मुद्दे घेऊन निघालेली कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. कन्याकुमारी पासून निघालेली ही यात्रा सध्या जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. २१ जानेवारी रोजी यात्रा जम्मूमध्ये असताना यात्रेपासून अवघ्या ७० किमीवर नरवाल येथे दोन बॉम्बस्फोट झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पत्र लिहण्यात आले आहे. या पत्रात राहुल यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असून यामध्ये दुर्लक्ष होऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली असून याबद्दल युवक कॉँग्रेसच्या वतीने मंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे सूचित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सरकारच्या अनेक धोरणाविरुद्ध तसेच देशातील अनेक समस्यांना मांडण्याचे काम करत असल्याने यात्रेवरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आणि यामुळेच काही ठिकाणी त्यांच्या संरक्षणात कमतरता झाल्याचेही यावेळी राऊत म्हणाले.

Rahul Gandhi Interview : लग्न केव्‍हा करणार? प्रश्‍नावर राहुल गांधी म्‍हणाले, “लग्नाबद्दल माझ्या मनात…”

जम्मूमध्ये २१ जानेवारी रोजी ‘भारत जोडो यात्रे’पासून काही अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाल्याने कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या ही यात्रा तिच्या शेवटच्या टप्प्यात असून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या धर्तीवर राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची मागणी काँग्रेसमधून होत आहे. पत्रामध्ये, काँग्रेसचा इतिहास बघता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा दहशतवादाने बळी घेतल्याचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालून सुरक्षेची जबादरी घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचलंत का?

Back to top button