महाराष्ट्र केसरी’चा फड उद्यापासून पुण्यात रंगणार, यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मिळणार पाच लाखांसह ‘महिंद्रा थार’

महाराष्ट्र केसरी’चा फड उद्यापासून पुण्यात रंगणार, यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मिळणार पाच लाखांसह ‘महिंद्रा थार’

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 65 व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा थरार मंगळवार (दि. 10) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा दि. 10 ते 14 जानेवारी या कालावधीत रंगणार असून 'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

'महाराष्ट्र केसरी'च्या तयारीचा आढावा व मैदानाची पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील 45 तालीम संघांतील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना मोटारसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य व अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे. समारोप शनिवारी (दि. 14) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रीजभूषण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सुसज्ज व्यवस्था

कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली असून 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली आहे. त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह चार अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री व जहाँगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे.

पुण्यातील 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा अनधिकृत

कोथरूड येथे दि. 10 ते 14 जानेवारीदरम्यान 'महाराष्ट्र केसरी' या नावाने कुस्ती स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या आयोजकांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून नियम व अटी शर्तीसह आयोजनासाठी पत्र देण्यात आले होते. परंतु, आयोजकांनी या पत्राचे उत्तर कुस्तीगीर परिषदेस दिलेले नाही. तसेच परिषदेच्या नियम व अटी शर्ती मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आलेली नाही. याची कुस्तीगीर आणि जिल्हा तालीम संघांनी नोंद घ्यावी. स्पर्धेबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

'ते' पत्रक दिशाभूल करणारे

भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीमार्फत ही स्पर्धा अधिकृतपणे घेण्याची जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानवर सोपवली आहे. राज्यातील 45 तालीम संघांचे कुस्तीगीर, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. असे असतानाही खोडसाळपणे पत्रक काढून विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची 'महाराष्ट्र केसरी' यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून, अशा खोडसाळ गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मामासाहेबांना अभिवादन

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा सुरू झाली. यंदाच्या 65 व्या 'महाराष्ट्र केसरी'चे संयोजन करण्याची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे आली, ही आनंदाची व गौरवाची बाब आहे. 'महाराष्ट्र केसरी'ची मुहूर्तमेढ रोवणार्‍या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल अशा स्वरूपाची ही स्पर्धा होणार आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मातीचा आखाडा ही महाराष्ट्राच्या कुस्तीची ओळख आहे. दोन आखाड्यांत माती विभागातील कुस्ती होणार असून, पैलवानांच्या स्वागतासाठी आखाडा सज्ज आहे. पैलवानांना कुस्ती करताना अडचण होऊ नये, यासाठी त्यात हळद, मीठ, काव, लिंबू, तेल मिसळून आखाडा तयार केला जात आहे, असे विलास कथुरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news