Monday motivation : इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन : गँगरेप झाला , भीक मागितली पण जिद्दी अशी की पटकावला किताब | पुढारी

Monday motivation : इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन : गँगरेप झाला , भीक मागितली पण जिद्दी अशी की पटकावला किताब

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेकदा जीवनात आशा काही घटना घडून जातात ज्या आपल्याला मुळापासून अस्वस्थ करतात. अनेकदा आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. पण खरी कसोटी ही संकटं नसतात तर आपण त्यांच्याशी कशाप्रकारे दोन हात करतो ही असते. असंच काहीसं घडलं नाज जोशी हिच्यासोबत. आजवर ७ ब्युटी पॅजेंटची विजेता असलेल्या नाजसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. नाजचा जन्म मुलगा म्हणून झाला असला तरी तिचा झुकाव स्त्रीत्वाकडे होता. त्यातूनच सुरू झाला अवहेलनेचा नवा प्रवास. तिच्या वेगळ्या असण्याची घरच्यांना लाज वाटू लागली. नाजच्या या बदलांना घरच्यांनी समजून घेण्याचं खूप लांब राहिलं ; उलट नाजला घरच्यांनी मुंबईला मामाकडे पाठवलं. पण आई-वडिलांच्या छत्राला पारख्या झालेल्या नाजवर इथे संकटांचा डोंगर कोसळला.

मामाने नाजला धाब्यावर काम केलं. त्यावेळी तिचं वय होतं फक्त ११ वर्षं. पण याच दरम्यान तिला आयुष्यातील सर्वात भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. कामावरून घरी आल्यावर मामा आणि त्याच्या मित्रांनी जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर गँगरेप केला. अकरा वर्षांच्या नाजला आपल्यासोबत नक्की काय घडत आहे हे आकलनाच्या पलीकडे होतं. तिला शुद्ध आली तेव्हा एकट्या असलेल्या नाजला केवळ वेदनांची सोबत होती. तिथे भेटलेल्या एका तृतीयपंथीय व्यक्तीने तिला किन्नर समाजाच्या गुरूंकडे नेलं. शिक्षण घेण्याच्या वयात या गुरूंनी तिला पैसे कमावण्याचा सल्ला दिला. यासाठी तिने डान्स बारमध्ये काम केलं, भीक मागितली, देह व्यापारातही उतरावं लागलं. पण शिकण्याच्या जिद्दीने तिने त्यातूनही १२ वी पर्यन्तचं शिक्षण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by NAAZJOSHII (@naazjoshi)

या सगळ्या अंधारात तिची बहीण आशेचा किरण बनून आली. एका नामांकित फॅशन डिझायनिंग संस्थेत तिने नाजला प्रवेश घेऊन दिला. यातून तिला तिची पहिली नोकरीही मिळाली. पण अजूनही जेंडरवरुन तिच्या मनात द्वन्द्व सुरू होतं. या सगळ्यातून तिने लिंगबदल सर्जरीचा पर्याय स्वीकारला. अनेक अडचणींवर मात करत तिने ही सर्जरी केली. यातूनच तिला तिची खरी ओळख मिळाली. या दरम्यान तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. मॉडेलिंगच्या वाटेवर चालताना तिची ब्युटी पॅजेंटच्या जगाशी ओळख झाली. आता तिच्यासाठी नवं क्षितिज तयार झालं होतं. मिस वर्ल्ड डायवर्सिटी ब्युटी पॅजेंटचा किताब नाजने जवळपास तीनवेळा आपल्या नावावर केला. देशातील पहिली इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन बनण्यासोबतच नाज पहिली ट्रान्सजेंडर कव्हर मॉडेलदेखील बनली. तिच्यासाठी हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. पण म्हणतात ना, ‘कोशिश करनेवालों की हार नही होती’ या ओळी नाजसाठी तंतोतंत लागू पडतात.

Back to top button