सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 11 कारखान्यांकडे सुमारे 141 कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. थकीत एफआरपी तत्काळ द्यावी; अन्यथा आरआरसीअंतर्गत कारखानदारांच्या मालमत्ता जप्त करून शेतकर्यांची देणी देऊ, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांनी गुरुवारी कारखानदार आणि प्रतिनिधींच्या बैठकीत दिला. यावेळी कारखानदारांच्या मागणीनुसार देणी देण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली.
सन 2021 पासून शेतकर्यांच्या गाळप केलेल्या उसाची बिले शेतकर्यांना अद्याप दिलेली नाहीत. जिल्ह्यातील 26 पैकी 13 कारखान्यांकडे 510 कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी होती. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी सातत्याने साखर आयुक्तांकडेही देणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित कारखान्यांना नोटीस बजावून देणी देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित 13 पैकी चार कारखान्यांनी 100 टक्के थकीत एफआरपी देणी दिली. उर्वरित 11 कारखान्यांकडे सुमारे 141 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्या देण्यांसाठी वारंवार सूचना देऊनही दखल न घेतल्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी संबंधित कारखान्यांची बैठक घेतली. यावेळी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कारखानदारांनी शिल्लक साखर, कोरोनासह अनेक कारणांमुळे थकित एफआरपी देण्यात अडचणी आल्याचे सांगितले.
शंभरकर यांनी थकबाकीदार कारखान्यांनी शेतकर्यांची तत्काळ देणी द्यावीत, असे स्पष्ट बजावले. देणी न दिल्यास कारखान्यांच्या मालमत्ता जप्त करू, असा इशारा त्यांनी दिला. कारखानदारांनी यावर आता महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे लवकरच शेतकर्यांना दिवाळीपूर्वी थकित एफआरपी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शंभरकर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकर्याच्या एफआरपीचे पैसे थकीत आहेत ते तत्काळ द्यावेत, अशा संबंधितांना बैठकीत सूचना दिल्या आहेत. पैसे वेळेत देऊन आरआरसीची कारवाई टाळावी, असेही बजावले आहे. कारखानदारांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. दिवाळीपूर्वी पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
त्यामुळे काही दिवसांतच शेतकर्यांना पैसे मिळतील; अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून शेतकर्यांची देणी देऊ, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी दिली आहे.