थर्टीफर्स्टच्या पाश्वभूमीवर मुंबईत "ऑल ऑउट ऑपरेशन" | पुढारी

थर्टीफर्स्टच्या पाश्वभूमीवर मुंबईत "ऑल ऑउट ऑपरेशन"

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात गुरुवारी रात्री “ऑल ऑउट ऑपरेशन” राबविले. या कारवाईत पोलिसांनी शहरात एकूण २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलीस अभिलेखावरील १ हजार ४७१ आरोपी तपासले. यात पोलिसांना २७१ आरोपी सापडले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात ९३ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये चाैधरी यांनी पोलीस ठाणी, नाकाबंदी आणि कोबिंगच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन कारवाईचा आढावा घेतला. ऑल ऑउट ऑपरेशनवेळी मुंबईतील ०५ प्रादेशिक विभगांच्या अप्पर पोलीस आयुक्तांसह विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळांचे पोलीस उपायुक्त, उपायुक्त विशेष शाखा, उपायुक्त सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कार्यवाही केली.

मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील २९ पाहिजे/ फरारी आरोपींसोबत अजामीनपात्र वाॅरंट बजावण्यात आलेल्या १३१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थ खरेदी / विक्री करणाऱ्या १६४ जणांवर अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३१ जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याजवळून चाकू, तलवारी अशी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. शहरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री, जुगाराचे अड्डे अशा ७३ ठिकाणी छापेमारी करुन पोलिसांनी हे अवैध धंदे उध्वस्त केले आहेत. तसेच, अन्य ३८ अवैध धंदयावर छापे टाकुन पोलिसांनी ५५ आरोपींना अटक केली आहे.

मुंबईतून तडीपार करण्यात आलेल्या ६४ आरोपींना विना परवाना शहरात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्हे करण्याच्या हेतूने शहरात वावरत असलेल्या १४८ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२०, १२२ आणि १३५ अन्वये कारवाई केली आहे. सोबतच पोलिसांकडून ३५३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्या आहेत.
मुंबईत १७८ ठिकाणी नाकाबंदी 

ऑल ऑउट ऑपरेशन दरम्यान शहरात १७८ ठिकाणी नाकाबंदी करुन ८ हजार ६९० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. यात ०२ हजार ३०० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तर, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये ६० वाहन चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
थर्टीफर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताच्या पाश्वभूमीवर शहरातील चाैपाट्या, बाजारपेठा, माॅल्स, मंदिरे अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ऑल ऑउट ऑपरेशन दरम्यान, बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने ८७२ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी केली. तसेच, प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने ५५५ मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.

परिमंडळ ०६ मध्ये सर्वाधिक कारवाई 

ऑल ऑउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ ०६ अंतर्गत ३१ ठिकाणी कोम्बिंग व ११ ठिकाणी नाकाबंदी करत सर्वाधिक ६३७ जणांवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. यात ०७ पाहिजे आरोपी, २४ अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी, १७ अवैध शस्त्र बाळगणारे आरोपी, अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली २३ आरोपी, रात्रीच्या वेळी चोरीच्या तयारीत असणाऱ्या १३ आरोपींवर १२२ मपोका अन्वये कारवाई, चोरांच्या टोळीपैकी ०७ आरोपींविरूध्द कलम ४०१ अन्वये कारवाई, पोलीस अभिलेखावरील २२ आरोपी विरोधात १५१ (१) मपोका अन्वये कारवाई, ०७ तडीपार आरोपींविरोधात कारवाई करून अटक, १६ अवैध धंदयावर, तसेच ३०६ इसमांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

.हेही वाचा 

अजित पवारांनी कडक शब्दांत टोचले मुख्यमंत्र्यांचे कान: आम्हाला तुमच्या वादाचं देणं-घेणं नाही; राज्याचे हित बघण्याचा दिला सल्ला

मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई, ५३८ कोटींचे ड्रग्ज केले नष्ट

मंत्रालयातील शिपाई कर्मचाऱ्यांच्या बोगस भरतीची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा : अजित पवार

Back to top button