बेताल वक्तव्ये करणार्‍यांना वेळीच रोखा : अजित पवार | पुढारी

बेताल वक्तव्ये करणार्‍यांना वेळीच रोखा : अजित पवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री आणि लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांना आवरा. महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकार्‍यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा अवमान केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बेताल वक्तव्य करून लोकांची मने दुखावली आहेत. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये सर्वांनी ऐकली आहेत. मात्र मुख्यमंत्री या सर्वांना पाठीशी घालत आहेत. त्यांनी अशा बेताल वक्तव्ये करणार्‍यांना योग्य ती समज यायला हवी. पण ते गप्प बसून आहेत. अशीच जर वक्तव्ये होत राहिली तर राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे अजित पवार म्हणाले.

भ्रष्टाचार करणारे सत्तारूढ किंवा विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी. महिलांना संरक्षण द्यावे. राज्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण करुन उद्योगांना राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा अनेक मागण्या अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केल्या.

मी शाईचा पेन वापरत नाही : मुख्यमंत्री

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर नागपूरच्या विधान भवनात शाईचे पेन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असेल तर मुख्यमंत्र्यांचेही पेन जप्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी शाईचा पेन वापरत नाही, असे त्यांना सांगितले.

Back to top button