संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने गरिबी आणि मानव विकास निर्देशांकाबाबतचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. 2005 ते 2021 या काळात भारतातील गरिबांच्या लोकसंख्येत घट झाल्याचे यामध्ये म्हटले आहे. गेल्या पंधरा वर्षांत भारतातील 41.5 कोटी लोकांची गरिबी आणि दारिद्य्रातून सुटका झाली आहे. या कालावधीत गरिबांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
जगातील 25 देशांचा यामध्ये आढावा घेण्यात आला. भारतासह 25 देशांनी गेल्या पंधरा वर्षांत प्रगती केल्याचे या निर्देशांकावरून जाणवते. अन्य देशांत कंबोडिया, चीन, कांगो, होंडूरस, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया, व्हिएतनाम आदी देशांचा समावेश आहे.
2005-06 मध्ये भारतातील गरिबांची लोकसंख्या 55.1 टक्के होती. 2022 अखेर गरिबांची लोकसंख्या 16.4 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. 15 वर्षांपूर्वी भारतातील गरिबांची लोकसंख्या 64.5 कोटी होती. 2019-20 अखेर गरिबांची लोकसंख्या 23 कोटी होती
इंधनाअभावी आहार बनवू शकत नसलेल्या गरिबांची संख्या पंधरा वर्षांपूर्वी 52.9 टक्के होती. ही संख्या आता 13.9 टक्के झाली आहे. स्वच्छतेचा अभाव असणार्यांची संख्या 50.4 टक्क्यांवरून 11.3 टक्क्यांवर आली आहे.
कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे. 15 वर्षांपूर्वी पुरेसा पोषण आहार मिळत नसलेल्यांची संख्या 44.3 टक्के होती. 2021 अखेर ही संख्या 11.8 टक्के झाली आहे. बालमृत्यूचे प्रमाणही 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर आले आहे.
स्वच्छ पाणी मिळत नसलेल्यांची संख्या 16.4 टक्के होती. या लोकांचे प्रमाण सध्या 2.7 टक्के आहे. घरात वीज मिळत नसलेल्यांची संख्या 44.9 टक्क्यांवरून 13.6 टक्के झाली आहे.