उदयनराजेंच्या भूमिकेची शरद पवारांकडून पाठराखण | पुढारी

उदयनराजेंच्या भूमिकेची शरद पवारांकडून पाठराखण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. या भूमिकेचे आम्हाला समाधान वाटते. मात्र, राज्य व केंद्र सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना उदयनराजेंच्या भूमिकेची पाठराखण केली.

गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान होत असूनही त्यांच्यावर राज्य किंवा केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे थेट 13 वे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करीत उदयनराजेंनी निर्धार शिवसन्मानाची मोहीम हाती घेत रायगडावर आत्मक्लेष आंदोलन केले. तसेच पुण्यातही निघालेल्या मूक मोर्चात सहभाग घेतला होता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शुक्रवारी उदयनराजेंच्या भूमिकेचे स्वागत करीत त्यांची पाठराखण केली. पवार म्हणाले, उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. पण, राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका बघ्याची आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचे आहेत. मला खात्री आहे, आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. लवकरच तो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल, अशी आशाही शरद पवारांनी व्यक्त केली.

Back to top button