राज्यात 4000 रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत

राज्यात 4000 रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत
Published on
Updated on

पुणे : प्रज्ञा केळकर-सिंग :  आजाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक रुग्णांना यकृत (लिव्हर) उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागतो. राज्यात गेल्या वर्षभरात केवळ 90 यकृतांचे दान झाले आहे, तर 4145 रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतचे गैरसमजदूर करण्यासाठी आणि मेंदू मृत झालेल्यांचे यकृत मिळवण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता व्यक्त होत आहे. यकृत निकामी झालेल्या व्यक्तीला नात्यातील व्यक्तीकडून किंवा मेंदू मृत व्यक्तीकडून यकृतदान केले जाऊ शकते. जिवंत व्यक्तीकडून यकृताचा काही भाग दान केला जातो. यकृतातील पेशींची पुन्हा वाढ होत असल्याने दात्याच्या शरीरातील यकृत दानानंतरही पूर्ववत होऊ शकते.

मात्र, आरोग्याला धोका पोहोचेल या भीतीतून जिवंत व्यक्तींचे यकृतदानासाठी पुढे येण्याचे प्रमाण कमी आहे. नात्यातील व्यक्तीचे यकृत न जुळल्यास अथवा मिळण्यात अडचणी आल्यास मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या यकृतासाठी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण समितीकडे अर्ज करावा लागतो. रुग्णाचा प्रतीक्षा यादीतील क्रमांक, रुग्णाची परिस्थिती, आजाराची तीव्रता यानुसार प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. एका वर्षात 90-100 यकृतांचे प्रत्यारोपण होत असल्याने दर वर्षी मागणीच्या तुलनेत केवळ 2-3 टक्के रुग्णांमध्येच यकृताचे प्रत्यारोपण होत आहे.

चयापचय क्रियेतील जन्मजात दोष, अतिरिक्त मद्यपान, यकृताचा दाह, पित्त साचणे अशा अनेक कारणांमुळे यकृत निकामी होण्याची शक्यता वाढते. 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी दोन वर्षांतून किमान एकदा आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि वयाच्या चाळीशीनंतर दरवर्षी तपासणी करावी. जेव्हा यकृताची कार्य करण्याची क्षमता पूर्णपणे कमी होते आणि त्याचे रूपांतर सि-हॉसिसमध्ये होते, तेव्हा यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो.
– डॉ. बिपिन विभुते, अवयव प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलियरी सर्जरी विभागाचे संचालक, सह्याद्री हॉस्पिटल

एका वर्षात शंभर ते सव्वाशे यकृतांचे प्रत्यारोपण होते. राज्य प्रत्यारोपण समितीकडील प्रतीक्षा यादीनुसार प्रत्यारोपणांचा प्राधान्यक्रम ठरवला जातो.
– डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news