Ambabai Temple Kolhapur : ‘अंबाबाई तीर्थक्षेत्र’ विकासासाठी 40 कोटी

Ambabai Temple Kolhapur : ‘अंबाबाई तीर्थक्षेत्र’ विकासासाठी 40 कोटी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी शुक्रवारी आणखी 40 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत. यामुळे 79 कोटी 96 लाख रुपयांच्या या आराखड्याला आतापर्यंत 50 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रथमच 40 कोटींचा निधी मिळाल्याने या आराखड्यातील कामांना गती येणार आहे. (Ambabai Temple Kolhapur)

या निधीतून श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 2023 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात 40 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. शुक्रवारी हा निधी वितरित करण्यात आला. यापूर्वी उपलब्ध झालेल्या 10 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्किंग बांधण्यात येत आहे. 236 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असेल.

पार्किंगची ही इमारत आता 24 मीटर उंचीची सात मजली केली जाणार असून, त्यामध्ये 200 भाविकांच्या निवासाची व्यवस्था असणारे भक्त निवास उभारले जाणार आहे. यामध्ये 47 खोल्या, 4 डॉरमेट्री, 50 लोकांसाठी उपाहारगृह प्रस्तावित आहेत. भक्त निवासाचे काम या उपलब्ध झालेल्या निधीतून मार्गी लागण्याची शक्यता आहे.

अंबाबाई मंदिर व परिसर विकास आराखडा हा 2008 सालात 190 कोटींचा होता. 2013 सालात हा आराखडा महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यानंतर दरसूचीतील बदलामुळे आराखडा 190 कोटीवरून 220 कोटींचा झाला. 2014-2015 मध्ये आराखडा 255 कोटींवर गेला. 2015 सालात फेरप्रस्ताव करून तीन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार 79 कोटी 96 लाखांच्या पहिल्या टप्प्याला 20 फेब—ुवारी 2019ला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यानंतर 8 मार्च 2019 रोजी 7 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यानंतर 20 मार्च 2020 मध्ये 1 कोटी 20 लाखांचा तर 29 मार्च 2023 रोजी 2 कोटी 50 लाख रुपयांचा असा एकूण 10 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता 40 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याने या आराखड्यातील प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news