कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कळंबा कारागृहातील बंदींना गांजा पुरविणार्या पोलिसाला अटक झाली होती. या प्रकरणानंतर कारागृह तपासणीला पुण्याहून आलेल्या पथकाला चार मोबाईल हँडसेट, सिमकार्ड मिळून आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गांजापाठोपाठ मोठ्या संख्येने मोबाईल मिळून आल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोबाईलप्रकरणी मोका न्यायाधीन बंदी अजय भानुदास कुलकर्णी, विद्यासागर ऊर्फ राजेश नामदेव चव्हाण या दोघांसह दोघा अनोळखींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारागृहातील शौचालयांच्या चेंबरमध्ये, ड्रेनेज पाईपमध्ये हे मोबाईल लपविल्याचे समोर आले आहे.
कळंबा कारागृहात गांजा घेऊन जाणार्या कारागृह सुभेदार बाळासाहेब गेंड याला 29 जुलैला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या घरझडतीत दोन किलो 300 ग्रॅम गांजा मिळाला होता. गेंड हा कारागृहातील बंदींना गांजा पुरवत होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारागृह पोलिसांचे एक पथक पुण्याहून तपासणीसाठी आले आहे. या पथकाने कारागृहातील सर्व बरॅकची झडती सुरू केली आहे.
शौचालयांच्या चेंबरमध्ये मोबाईल
कारागृहातील सर्कल पाच, बरॅक क्र. 3 च्या शौचालयामध्ये एक मोबाईल ठेवण्यात आला होता. तर सर्कल 6 मधील शौचालयाच्या ड्रेनेज पाईपमध्ये मोबाईल, बॅटरी मिळून आली आहे. मोकातील बंदींकडेच दोन मोबाईल मिळाले आहेत. याठिकाणी एक सिमकार्ड मिळाले असून त्यावर आलेल्या व गेलेल्या कॉलवरून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
सुरक्षिततेला धोका
कळंबा कारागृहात गांजा मिळून आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, मोबाईलसारख्या प्रकाराने येथील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इचलकरंजी, सांगलीतील गुन्ह्यांच्या तपासात कळंबा कारागृहातून धमक्या आल्याचे तपासात पुढे आले होते. यामुळे अशाप्रकारे गुन्हेगार कारागृहातूनच त्यांची दहशत निर्माण करीत असतील तर ही कारागृहाची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी आहे हे अधोरेखित होते.