4 G पेक्षा 100 पट वेगवान 5G सुरू

4 G पेक्षा 100 पट  वेगवान 5G सुरू
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वेगवान इंटरनेट सेवा 5-जीचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाला. 4-जीपेक्षा 5-जी 100 पट वेगवान असेल. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित सहाव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचे (आयएमसी) उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशातील 5-जी तंत्रज्ञानाचा प्रारंभ करण्यात आला. 'इंटरनेट फॉर ऑल' (इंटरनेट सर्वांसाठी) या लक्ष्यप्राप्तीसाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकारने ज्याप्रमाणे प्रत्येक घरी वीज, 'हर घर जल' अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी आणि उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवले आहे, त्याचप्रमाणे आता सर्वांना इंटरनेट उपलब्ध करवून देणार आहोत, असा संकल्प मोदींनी बोलून दाखविला.

तंत्रज्ञानही गरिबांसाठी!

अनेकांनी 'आत्मनिर्भर भारत'च्या स्वप्नाचे हसू उडवले. तंत्रज्ञान गरिबांसाठी नाही, अशीच मानसिकता लोकांची बनली होती. मात्र, तंत्रज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवता येईल, हा विश्वास आम्हाला होता. 21 व्या शतकासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून, 5-जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घेऊन येईल. 'डिजिटल इंडिया'चे हे मोठे यश असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

भारताची मोठी भूमिका

भारत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या विकासात, वायरलेस तंत्रज्ञानाच्या डिझाईनमध्ये एक प्रमुख भूमिका नजीकच्या काळात बजावेल. 4-जी तंत्रज्ञानासाठी भारत दुसर्‍यांवर अवलंबून होता. परंतु, 5-जी इंटरनेटमुळे आता संपूर्ण 'आर्किटेक्चर' बदलणार आहे. ही बाब इंटरनेट वापरणार्‍यांना माहिती आहे. 5-जी तंत्रज्ञानाने देशातील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील.

5-जी हे संधीचे अनंत आकाश

अनेकांना डिजिटल इंडिया केवळ एक सरकारी योजना वाटते. परंतु, हे देशाचे व्हिजन आहे. नागरिकांसोबत जुळवून घेत त्यांच्यासाठी काम करणारे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीने 130 कोटी भारतीयांना 5-जीच्या निमित्ताने एक भेट दिली आहे. 5-जी संधीच्या अनंत आकाशाची सुरुवात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

इतिहासात नोंद होणार…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या ऐतिहासिक कालखंडात 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाईल. 2-जी, 3-जी, 4-जीच्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. परंतु, 5-जीसोबत भारताने नवीन इतिहास रचला आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

देशातून कोट्यवधी मोबाईलची निर्यात

5-जीसह भारत पहिल्यांदा टेलिकॉम टेक्नॉलॉजीत जागतिक मानके निश्चित करीत नेतृत्व करतो आहे. 2014 मधील 'झीरो' मोबाईल फोन निर्यातीपासून आज आम्ही हजारो कोटी फोन निर्यात करणारा देश बनलेलो आहोत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम डिव्हाईसच्या किमतीवर झाला आहे. आता कमी किमतीत आम्हाला जास्त फिचर्स मिळू लागले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारचा हेतू चांगला असेल तर…

डिजिटल पेमेंटचा मार्ग सरकारने सुकर बनवला. सरकारने स्वतः अ‍ॅपच्या माध्यमातून नागरी केंद्रीय वितरण सेवेला प्रोत्साहन दिले. शेतकरी असो वा छोटा दुकानदार, त्यांना अ‍ॅपच्या माध्यमातून दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दाखवला. लहान व्यापारी, उद्योजक, स्थानिक कलाकार तसेच कारागिरांना 'डिजिटल इंडिया'ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुविधा सुलभ होते तेव्हा विचार सशक्त होतात. सरकार जर चांगल्या हेतूने काम करीत असेल, तर नागरिकांचा हेतू बदलण्यात वेळ लागत नाही, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

'अ‍ॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया'चा स्टॉल

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात 'सीओएआय'च्या वतीने आयोजित प्रदर्शनाकडे राजकीय क्षेत्रातील नामांकित लोक, दूरसंचार, पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कंपन्या तसेच आयसीटी क्षेत्रातील संस्थांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणूनही पाहिले जाते. यंदाच्या प्रदर्शनात पुण्यातील 'अ‍ॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया प्रा. लि.'चा स्टॉल असणार आहे.

5-जी वापराचे हे फायदे

* जलदगतीचे इंटरनेट वापरू शकणार
* व्हिडीओ गेमिंगमध्ये मोठे बदल होतील
* व्हिडीओ बफरिंग होणार नाही
* इंटरनेट कॉलमध्ये, आवाज स्पष्टपणे येईल
* 2 जीबीचा चित्रपट 10 ते 20 सेकंदात डाऊनलोड
* शेतीसाठी ड्रोनचा वापर होणार शक्य
* मेट्रो आणि चालकविरहित वाहने चालवणे शक्य
* व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसह कारखान्यांत रोबो वापर

दिल्ली, मुंबईसह सहा ठिकाणी 5-जी

देशात शनिवारपासून 5-जी मोबाईल सेवा सुरू झाली. एअरटेलने वाराणसीमध्ये आणि जिओने अहमदाबादमधील एका गावात 5-जीची सुरुवात केली. यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 5-जी ही डिजिटल कामधेनू आहे. भारतीयांच्या जीवनात ती आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. स्वस्त दरात आरोग्यसेवा शक्य होतील. जिओच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यात 5-जी सेवा पोहोचवली जाईल. भारती-एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी वाराणसीसह दिल्ली, मुंबई आणि देशातील पाच शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केल्याची घोषणा केली.

जिओने आपल्या एका प्रात्यक्षिकात 4 शाळा एकत्र जोडल्या. मुंबईतील एका शिक्षकाने या चारही वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिकवले. अहमदाबादमधील रोपरा प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

व्होडाफोन-आयडियाच्या 5-जीच्या साहाय्याने दिल्ली मेट्रोच्या बांधकामातील बोगद्यात काम करणार्‍या लोकांशी मोदींनी चर्चा केली. एअरटेलच्या डेमोमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या मदतीने सौर यंत्रणेबद्दल शिकवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news