विदेशी भारतीयांनी मायदेशी पाठवले १०० अब्ज डॉलर्स

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : विदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून भारतात पाठवण्यात येणाऱ्या पैशाने या वर्षी १०० अब्ज डॉलर्सचा विक्रमी पल्ला गाठला आहे. विदेशातून मायदेशी पैसे पाठवणाऱ्या देशांच्या यादीत भारताने मेक्सिको, चीन आणि फिलिपाईन्सलाही मागे टाकत प्रथम स्थान मिळवले आहे.
जागतिक बँकेने या आर्थिक उलाढालीबाबत दिलेल्या अहवालात होत असलेल्या आणि झालेल्या बदलांचे चित्र मांडले आहे. अहवालात नमूद केले आहे की, विदेशात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या भारतीयांकडून मायदेशी पैसे पाठवण्यात तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाली असून हा आकडा २०२२ मध्ये १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत मेक्सिको, चीन आणि फिलिपाईन्स या देशांचे या बाबतीत वर्चस्व असायचे. त्यांना भारताने मागे टाकले आहे. उच्च उत्पन्न देशांतून भारतात येणाऱ्या पैशाचे प्रमाण २०१६-१७ मध्ये २६ टक्के होते, ते २०२० २१ मध्ये १० टक्क्यांनी वाढून ३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. उलट सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह पाच आखाती देशांतून येणारा पैशाचा ओघ घटला आहे. तो ५४ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर आला आहे, असे नमूद करताना जागतिक बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा दाखला दिला आहे.
बेकायदा मार्गाचा वापर
- एकीकडे भारतात येणारे उत्पन्न वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या शेजारी देशांत विदेशातून येणाऱ्या पैशांत घट झाली आहे. चलन विनिमय दरात बदल झाल्याने त्यांचे मायदेशी येणाऱ्या पैशाचे प्रमाण घटले.