आफताबने दिली कबुली; ब्रेन मॅपिंग चाचणी होण्याची शक्यता | पुढारी

आफताबने दिली कबुली; ब्रेन मॅपिंग चाचणी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : श्रद्धाला याआधीच ठार मारण्याचा विचार होता, असे सांगत आफताब पूनावालाने पॉलिग्राफ चाचणीत श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली. दरम्यान, आफताबच्या नव्या प्रेयसीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली असून, आपल्याशी तो अतिशय चांगला वागला व त्याने अंगठीसह काही भेटवस्तूही दिल्याचे तिने सांगितले. तसेच आपण त्याच्या घरी गेलो तेव्हा फ्रिजमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे होते, हे ऐकून आता भयंकर धक्का बसल्याचे तिने सांगितले.

श्रद्धा वालकर खून प्रकरणात खुनी आफताब पूनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, चाचणीदरम्यान आफताब शांत होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. श्रद्धाला याआधीच ठार मारण्याचा विचार होता, असेही सांगितले. केलेल्या कृत्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यात नव्हता. चाचणीत त्याने आपण खून कसा केला, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे नंतर कुठे व कसे फेकले, याचा तपशील दिला.

दरम्यान, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धाचा खून १८ तारखेला रात्री ९ च्या आसपास केल्याचे आफताब सांगत आहे; पण त्याच्या मोबाईल रेकॉर्डच्या तपासणीनुसार त्याने त्या दिवशी रात्री १० च्या सुमारास अॅपच्या माध्यमातून जेवण मागवल्याचे स्पष्ट होते. यामुळे एक तर तो खुनाची तारीख चुकीची सांगत असावा किंवा अत्यंत क्रूरपणे त्याने त्यावेळी मृतदेहापाशी जेवण केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने आणखी तपास सुरू आहे.

ब्रेन मॅपिंग होण्याची शक्यता आफताबची पॉलिग्राफ चाचणी झाली असून, आता नार्को टेस्ट होणे बाकी आहे. या दोन्ही चाचण्यांतून समाधानकारक माहिती हाती आली नाही, तर आफताबची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. आगामी नार्को पोलिस टेस्टचा निकाल काय येतो, यावर हे अवलंबून आहे.

नव्या प्रेयसीला जबर धक्का
‘बंबल’ या डेटिंग अॅपवरून आफताबच्या जाळ्यात अडकलेल्या दिल्लीतील एका मानसोपचारतज्ज्ञ तरुणीची पोलिसांनी चौकशी केली. आफताबने श्रद्धाचा क्रूर खून केल्याचे समजल्यावर बसलेल्या धक्क्यातून ती सावरलेली नाही. तिने सांगितले की, आपण आफताबच्या घरी दोन- वेळा गेलो होतो. त्यावेळी फ्रिजमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे होते, हे माहितीच नव्हते. आफताबचे वागणे अगदी नॉर्मल होते. तो खूप काळजीने वागायचा. त्याला सिगारेट ओढण्याची सवय होती. आपली सिगारेट तो आपणच तयार करायचा. त्याच्याकडे विविध अत्तरे आणि परफ्यूमचा संग्रह होता. त्याने काही वस्तू आणि एक अंगठीही भेट दिल्याचे तिने सांगितले; पण ती अंगठी श्रद्धाची आहे, हे कळाल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. त्याला खाण्याची खूप आवड होती. शेफ लोक पदार्थ कसे सजवतात याची तो माहिती सांगायचा, असेही ती म्हणाली.

Back to top button