… म्हणून विक्रम गोखले यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा घेतला होता अभिनय क्षेत्रातून संन्यास, वाचा सविस्तर | पुढारी

... म्हणून विक्रम गोखले यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा घेतला होता अभिनय क्षेत्रातून संन्यास, वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनयाची स्वत;ची अशी खास शैली निर्माण करणारे अभिनेते विक्रम गोखले यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाटक, मालिका, सिनेमे या सगळ्या माध्यमातून त्यांनी अभिनयाचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या अनेक आठवणींना आज उजाळा मिळतो आहे. दरम्यान दूरदर्शनला त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीतील किस्साही व्हायरल होतो आहे.
नाट्य क्षेत्रातील करियर ऐनभरात असताना विक्रम गोखले यांनी जवळपास सात वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला होता. अभिनयातून संन्यास घेऊन त्यांनी गावी जाऊन शेती करण्याचा मार्ग पत्करला होता.

खरंतर त्यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याने कसलेल्या आणि लोकप्रिय अभिनेत्याने करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना असा अचानक अभिनयातून संन्यास घेणे हे अनेकांच्या भुवया उंचावणार ठरलं होतं. त्यावेळी देखील अनेकांनी त्यांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासही सुचवलं होतं. पण कुणाच्याही कोणत्याही आग्रहाला न जुमानता सहा मे 1982 ते 2 मे 1989 पर्यंत ते अभिनय क्षेत्रापासून लांब होते. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणतात की, ‘एखाद्या माणसाची त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची उपजीविका विशिष्ट क्षेत्रामुळे चालत असेल तर त्या क्षेत्राने ही त्या कामाशी प्रामाणिक राहून वेळोवेळी मोबदला देणं गरजेचं असतं. माझ्या कामाचे कष्टाचे पैसे जर माझ्या वेळेत मिळणार नसेल तर ह्या क्षेत्राचा मला काय उपयोग?

माझ्या कष्टाच्या पैशांसाठी जर मला हात पसरावे लागत असतील तर ते मला त्रासदायक वाटतं आणि त्यामुळेच मी अभिनयसृष्टीला हात जोडून निघून गेलो होतो. त्यामुळे क्षेत्रातल्या गोष्टी कलाक्षेत्रातल्या गोष्टीला अर्थकारणाची योग्य जोड मिळणे हे अतिशय गरजेचे आहे. ‘
अनेक नाटकं गाजवल्यानंतर विक्रम गोखले यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातील अभिनयातून पुन्हा एकदा संन्यास घेतला होता.

(शब्दांकन : अमृता पाटील – चौगुले )

Back to top button