Winter Session of Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरूवात | पुढारी

Winter Session of Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरूवात

पुढारी ऑनलाईन: संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी दिली. आगामी हिवाळी अधिवेशनात एकूण 23 दिवस कामकाज होणार असून 17 बैठका होतील, असे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

हे पहिलेच अधिवेशन असेल ज्या दरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यसभा सभागृहातील कामकाज चालवणार आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी असली तरी, देखील हे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल. या अधिवेशनात २३ दिवसांच्या काळात १७ बैठका होणार आहेत. देशाच्या अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर बाबींवर चर्चेची अपेक्षा आहे. या दरम्यान सर्वपक्षीय संसदीय सदस्यांकडून विधायक चर्चेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची मागणी करू शकतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभासद दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव हे अशा नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाली आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. लोकसभा तसेच राज्यसभा सचिवालायातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. अशात यंदाच्या अधिवेशनात कुठलेही कोरोना प्रतिबंध लावण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १७ कार्य दिवसांच्या या अधिवेशना दरम्यान विविध विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेचे मान्सून अधिवेशन १८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आले होते.२२ दिवसांमधे १६ बैठका झाल्या होत्या.

हे ही वाचा :

बँकांचा आजचा संप लांबणीवर

राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड, पारा ‘इतक्या’ अंशांवर

Back to top button