नाशिक : जिल्ह्यात जन्मदर वाढविणे तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील मोहीम आखली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. गेल्यावर्षी मार्च ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 483 जिल्ह्यांत बालके दगावली होती. यंदा यामध्ये 104 ने घट होऊन 2023 मार्च ते डिसेंबर या नऊ महिन्यांत 379 बालकांचा मृत्यू झाला आहे. यात 0 ते 1 वर्षाआतील 318 अर्भके, तर 1 ते 5 वर्षांतील 61 बालकांचा समावेश आहे. दरम्यान, असे असले तरी बालमृत्यू दर कमी करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील महापालिका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यातील बालकांच्या मृत्यूची नोंद ठेवली जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुकानिहाय ही माहिती संघटित केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच डिसेंबरअखेरपर्यंत 379 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देवळा तालुक्यात नऊ महिन्यांत जन्मदराचे प्रमाण चांगले आहे. देवळा तालुक्यात अर्भक मृत्यू झालेल्या बालकांची संख्या दोन आहे, तर बालमृत्यू शून्य आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात अर्भक मृत्यू 53, तर बालमृत्यू 5 असे सर्वाधिक 58 मृत्यू मार्च ते डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांत झालेले आहेत. तुलनात्मकरीत्या बघितल्यास मार्च ते डिसेंबर 2022 दरम्यान अर्भक मृत्यू 395, तर बालमृत्यू 88 होते, तर 2023 च्या मार्च ते डिसेंबर महिन्यात अर्भक मृत्यू 318, तर बालमृत्यू 61 होते. जिल्हा प्रशासन यावर काम करत असले, तरी बालमृत्यू रोखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.