आगळी-वेगळी लव्ह स्टोरी! सुनाक यांच्यासाठी अक्षताने उंच टाचेच्या सँडल सोडल्या! | पुढारी

आगळी-वेगळी लव्ह स्टोरी! सुनाक यांच्यासाठी अक्षताने उंच टाचेच्या सँडल सोडल्या!

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनाक आणि अक्षता मूर्ती-सुनाक या दाम्पत्याची उंची थोड्याफार फरकाने सारखी आहे. अक्षता उंच टाचेच्या सँडल घालत तेव्हा त्या ऋषी यांच्यापेक्षा उंच दिसत. अक्षता यांनी पुढे लवकरच उंच टाचेच्या सँडल घालणे सोडले. ऋषी आजही या आठवणीवर हसतात आणि याबद्दल अक्षता यांचे ऋण व्यक्त करतात…

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे अक्षता यांचे वडील. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ऋषी यांना पाहिले, त्याच क्षणी जावई म्हणून पसंत केले होते. त्याबद्दलही ऋषी कृतज्ञता व्यक्त करतात. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांची राजकीय कारकीर्द जशी रंजक आहे, तशीच त्यांची प्रेमकथाही… ऋषी आणि अक्षता मूर्ती यांच्या लग्नाला 15 वर्षांवर काळ लोटला आहे. दोघांची पहिली भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली होती. ‘एमबीए’साठी दोघेही येथे होते. एकदा दोघांनी कॉफी शॉपच्या बाहेर बराच वेळ एकत्र घालवला होता.

‘डेली मेल’ या लंडनमधील आघाडीच्या दैनिकाने ही ‘लव्ह स्टोरी’ वृत्तस्वरूपात छापली आहे. या वृत्तात म्हटले आहे, अक्षताला पाहताच क्षणी ऋषी तिच्या प्रेमात पडले होते. तिच्यासोबत क्लास करता यावा म्हणून ते वेळेचे नियोजन करत असत. ऋषी स्वत: एक किस्सा सांगतात. माझी उंची केवळ 5 फूट 6 इंच आहे. अक्षताही साधारणपणे इतक्याच उंचीची. अक्षताने उंच टाचांच्या सँडल घातल्या की त्या माझ्याहून उंच दिसत. 18 वर्षांपूर्वीच अक्षता यांनी यापुढे कधीही उंच टाचांच्या सँडल न घालण्याचे ठरवून टाकले होते, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, हे सांगताना ऋषी यांना हसू आवरता आले नाही. नारायण मूर्ती आणि ऋषी सुनाक यांची पहिली भेट बंगळूर येथे झाली होती. या भेटीनंतर लेक अक्षताला मूर्तींनी पत्र लिहिले. ‘तू मला सांगितलेले सारे गुण त्याच्यामध्ये आहेत. तो मला एक अद्वितीय, उमदा आणि प्रामाणिक माणूस वाटला.’

बंगळूरमध्ये विवाह

2009 मध्ये ऋषी आणि अक्षता यांचा विवाह बंगळूरमधील चामराजा कल्याण मंडपात झाला. लीला पॅलेस हॉटेलमध्ये रिसेप्शन झाले होते. या वेळी अझीम प्रेमजी, किरण मुजूमदार शॉ, नंदन नीलेकणी, प्रकाश पदुकोण, क्रिकेटपटू सईद किरमाणी, अनिल कुंबळे, अभिनेते गिरीश कर्नाड उपस्थित होते.

Back to top button