Diwali Festival : निरोगी आयुष्यासाठी असे करा भगवान ‘धन्वंतरी’ चे पूजन | पुढारी

Diwali Festival : निरोगी आयुष्यासाठी असे करा भगवान 'धन्वंतरी' चे पूजन

पुढारी ऑनलाईन डेस्क :  Diwali Festival : आपण आरोग्यम् धनसंपदा असे म्हणतो. उत्तम आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे, असा याचा अर्थ. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. भगवान धन्वंतरींना आद्य वैद्य मानले जाते. किंवा आजच्या भाषेत भगवान धन्वंतरी हे या जगातील पहिले डॉक्टर होय. त्यांनाच आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाते.

Diwali Festival : आख्यायिका

धार्मिक मान्यतेनुसार धन्वंतरीच्या प्रकटण्याची आख्यायिका, स्कंदपुराण, विष्णूपुराण, महाभारत यांच्यामध्ये देण्यात आली आहे. ती आख्यायिका असे सांगते की एकदा दुर्वासा ऋषि वैकुंठातून बाहेर पडले. समोर इंद्र त्याच्या ऐरावत वरून जात होता. यावेळी दुर्वासा ऋषिंनी एक दिव्य माळा इंद्राला भेट म्हणून दिली. इंद्राने ती घेऊन ऐरावतच्या मस्तकावर ठेवली. मात्र, चुकून ती खाली पडली आणि ऐरावतच्या पायाने तुडवली गेली.

हे पाहून दुर्वासा ऋषिंना राग आला. त्यांनी इंद्राला श्राप दिला. तुझे सर्व स्वर्ग वैभव नष्ट होईल. आणि सर्व देव शक्तिहीन होतील. या श्रापामुळे देव-दानव युद्धामध्ये देवांची कायम पराजय होत असे. तसेच दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या असल्याने ते मृत दानवांना पुन्हा जीवंत करत असे. या सर्व समस्यांमधून बाहेर कसे पडावे यासाठी ते भगवान श्री हरि विष्णू यांच्याकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णुंनी समुद्रमंथन करून त्यातून अमृत मिळवण्याचा सल्ला देवांना दिला. त्यासाठी दानवांची देखिल मदत घेण्यास सुचवले.

देव-दानव समुद्रमंथन झाले. वेगवेगळी 14 रत्न बाहेर पडली. या पैकी 14 वे रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी होय. त्यांना भगवान श्रीहरि विष्णुंचा अंशावतार मानण्यात आले. धन्वंतरी आयुर्वेदाचे ज्ञाते प्रणेते होते. तसेच ते अमृत कलश घेऊन प्रकरटले. त्यामुळे या अमृत कलशासाठी सुद्धा देव-दानवांमध्ये युद्ध झाले. समुद्रमंथन करताना ज्या दिवशी भगवान धन्वंतरी प्रकटले तो दिवस म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशी. म्हणूनच याला धनत्रयोदशी असे म्हणतात. त्यांना भगवान श्री हरि विष्णुंचा अंशावतार मानले जाते. त्यामुळे या दिवशी निरोगी जीवनासाठी आज धन-धान्यासह भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते.

Diwali Festival : असे करा धन्वंतरी पूजन

धन्वंतरीची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ जागेवर पवित्र ठिकाणी स्थापन करून आपले तोंड पूर्वेला होईल अशा रितीने पूजा करावी. भगवान धन्वंतरीला गंध लावून, गुलाल अर्पण करून तुळस, ब्राह्मी, शंखपुष्पी अशा पूजनीय औषधी वनस्पती अर्पण कराव्या. भगवान धन्वंतरी यांना खीरचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आपणास एखादा जुनाट आजार असेल तर त्यापासून मुक्ततेसाठी भगवान धन्वंतरीकडून सकारात्मक पद्धतीने प्रार्थना करावी. तसेच कायम निरोगी जीवनासाठी प्रार्थना करावी. आतापर्यंतच्या निरोगी आयुष्यासाठी भगवान धन्वंतरीला धन्यवाद द्यावे.

हे ही वाचा :

‘वसुबारस’ने आजपासून दिवाळी सणास प्रारंभ

Deepotsav : दीपोत्सव…आनंदोत्सवाला प्रारंभ

Back to top button