सूत्र रब्बी हरभर्याचे

सूत्र रब्बी हरभर्याचे – सत्यजित दुर्वेकर
कडधान्य पिकामध्ये हरभरा हे महत्त्वाचे पीक आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहे. महाराष्ट्राची उत्पादकता 917 कि./हे. इतकी आहे. येत्या रब्बी हंगामात शेतकरी बंधूंसाठी हरभरा लागवड फायदेशीर ठरू शकेल; परंतु त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
देशाच्या एकूण कडधान्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा 13 टक्के आहे. महाराष्ट्रात कडधान्य पिकाखाली 41.43 लाख हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन 31.60 लाख टन आणि उत्पादकता 770 किलो प्रतिहेक्टर आहे. कडधान्य पिकाचे शेती आणि माणसांच्या आहारात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास कडधान्य पिकाचे मोठे योगदान आहे. शिवाय, कडधान्य पिकानंतर घेण्यात येणार्या पिकांसाठी उत्तम बेवड तयार होते. कडधान्य पिकामध्ये हरभरा हे महत्त्वाचे पीक आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहे. महाराष्ट्राची उत्पादकता 917 कि./हे. इतकी आहे. येत्या रब्बी हंगामात शेतकरी बंधूंसाठी हरभरा लागवड फायदेशीर ठरू शकेल; परंतु त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जमीन : हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी, कसदार व चांगल्या निचर्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.
पूर्व मशागत : खरिपाचे पीक काढल्यानंतर एक खोल नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. काडीकचरा, धसकटे वेचून जमीन पेरणीयोग्य करावी. खरिपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पेरणीची वेळ : हरभरा पिकास कोरडी व थंड हवा चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रामुख्याने विजय व दिग्विजय हे वाण वापरावे. बागायती हरभर्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर यादरम्यान करावी. शेतकरी बंधूंकडे जर सिंचनाची सोय उपलब्ध असेल, तर काबुली हरभरा घेतला तरी चालेल.
सुधारित वाण : पेरणीसाठी पारंपरिक वाणाचा उपयोग करू नये. कारण, असे वाण रोग व किडीस बळी पडते व आपणास अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सुधारित वाणांमध्ये देशी हरभर्याचे विजय, विशाल, दिग्विजय हे मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभर्याचे विराट, विहार, पी.के.व्ही.-2 (काक-2) हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. विशाल हे टपोर्या दाण्याचे वाण आहे. विराट हे अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम काबुली चणा आहे.
पेरणीची पद्धत : देशी हरभर्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या टोकणी यंत्राने टोकणी केल्यास दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील 10 सें.मी. या अंतरावर पेरणी करता येते.
बियाण्याचे प्रमाण : विजय हरभर्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो, तर विशाल, दिग्विजय, विराट किंवा पी.के.व्ही.-2 या वाणाचे हेक्टरी 100 किलो बियाणे लागते. सरी वरंबा पद्धतीमध्ये भारी जमिनीत 90 सें.मी. रुंदीच्या सर्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सें.मी. अंतरावर टोकण करावी. काबुली वाणासाठी जमीन ओली करून पेरणी केली असता उगवण चांगली होते.
बीज प्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम बावीस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोटर्मा याची बीज प्रक्रिया करावी. यानंतर 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास रायझोबियम या जीवक संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी.
पाणी व्यवस्थापन : हरभरा पिकास 25 सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. पेरणीनंतर एक हलके पाणी दिल्यास उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये पाण्याची पहिली पाळी 25 ते 30 दिवसांनी, पाण्याची दुसरी पाळी 45 ते 50 दिवसांनी व गरजेनुसार तिसरी पाळी 65 ते 70 दिवसांनी द्यावी. पाण्याचा ताण बसल्यास जमिनीत भेगा पडतात. भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास जास्त पाणी बसून पीक उन्मळून जाते. पिकात पाणी साचून राहिल्यास मूळ कुजव्या रोगाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामुळे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.