महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांचे ट्विट करत अभिवादन | पुढारी

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांचे ट्विट करत अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना, असं ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन केले आहे.

महात्मा गांधी : गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक

राज ठाकरे यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.

श्रृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असेही त्‍यांनी ट्विटमध्‍ये नमूद केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button