महागाई विरोधात धारावीत स्मृती इराणी यांना दाखवले काळे झेंडे | पुढारी

महागाई विरोधात धारावीत स्मृती इराणी यांना दाखवले काळे झेंडे

धारावी ; पुढारी वृत्तसेवा : पोषण जागृती अभियाना अंर्तगत सोमवारी (दि.6) सकाळी धारावी काळाकिल्ला येथील एका अंगणवाडीच्या भेटीसाठी आलेल्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचा धारावी काँग्रेसच्या महिला आघाडीने काळे झेंडे तसेच महागाईचा फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. स्मृती इराणी पेट्रोल आणि डिझेल बाबत काळे झेंडे दाखवण्यात आले.

नगरसेविका गंगा कुणाल माने, आयशा अस्लम खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रेणुका सोनावणे, सेल्वी संतोषी, मैसर शेख यांच्यासह अस्लम खान, राज साळुंके महिला तसेच पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

धारावी पोलिसांनी लागलीच प्रसंगावधान राखत महिला आंदोलनकर्त्यांना धारावी शनिमंदिर मार्गावरील मनपा शाळा परिसरात रोखून धरल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

संपूर्ण देशात कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या चर्चेला उधाण आले असताना केंद्राकडून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली जात आहे.

परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असताना केंद्र सरकारकडून देशभरातील कुपोषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पोषण जागरूकता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. महागाईमुळे नागरिकांची उपासमार होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असून कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. उदरनिर्वाह भागवणे कठीण झाले आहे. त्यात जीवघेणी महागाई सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत असताना महागाई वाढवून पोषण जागृती अभियान राबवणे हास्यास्पद आहे, अशी टीका केली.

Back to top button