सिंहगडावरील धोकादायक ठिकाणी सूचनाफलकांची गरज | पुढारी

सिंहगडावरील धोकादायक ठिकाणी सूचनाफलकांची गरज

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: सिंहगडावरील अनेक ठिकाणे ही धोकादायक आहेत. अशा हत्ती टाक्यात पडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चवदार पाण्याचे टाके म्हणून जगविख्यात असलेल्या सिंहगड किल्ल्यावरील देव टाक्याजवळच अतिदुर्गम शिवकालीन हत्ती टाके आहे. अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात हत्ती टाके आहे. नावाप्रमाणेच टाक्याचा आकार प्रशस्त आहे. विशाल खडकात टाके खोदलेले आहे. टाके 40 ते 50 फूट खोल आहे. टाक्याच्या वरील बाजूला सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग आहे.

टाक्यात उतरण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. सततच्या पावसामुळे टाके तुडुंब भरून वाहत आहे. पाणी वाहून टाक्याच्या खालच्या बाजूच्या वाटा निसरड्या झाल्या आहेत. महाविद्यालयीन युवक शाहिद मुल्ला व त्याचे सहकारी मित्र टाक्याच्या खालच्या बाजूने चालले होते. त्या बाजूला संरक्षित रेलिंग नाही. संततधार पावसामुळे पायवाटा निसरड्या झाल्या आहेत. त्यात खडक, दगडांवर शेवाळ साठले आहे. येथून जात असताना शाहिद हा पाय घसरून हत्ती टाक्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

हत्ती टाक्याच्या खालच्या बाजूचा हा मार्ग धोकादायक आहे. तेथे दुर्घटना घडली. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात दुपटीने पर्यटक येत आहेत. कल्याण, पुणे दरवाजा, तानाजी कडा व परिसरातील धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी तरुण, हौशी पर्यटक जिवाची पर्वा करीत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना वाढल्या आहेत. सततच्या पावसामुळे बुरूज, तटबंदी व इतर मार्ग निसरडे झाले आहेत. तटबंदी, बुरूज, गडावरील पाण्याची तळे, टाके तसेच खोल कड्यावरील मार्गावर जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध करण्यात यावा तसेच सूचनाफलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Back to top button