पनवेल: स्कूल बसला आग; वाहकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावले | पुढारी

पनवेल: स्कूल बसला आग; वाहकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावले

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : खारघर येथे एका स्कूलबसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. परंतु, सुदैवाने वाहकाच्या सतर्कतेमुळे त्याने बसमधील तिन्ही विद्यार्थ्यांना खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली.

सीबीडी बेलापूर येथील पिपल्प ऐज्युकेशन सोसायटीची ही स्कूल बस आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास खारघर वसाहतीमधील सेक्टर १५ घरकुल सोसायटी ते गुडवील इमारत येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस पुढे जात होती. यावेळी अचानकपणे बसमधून धूर येऊ लागल्याने चालकाने क्लिनरच्या मदतीने बस बाजूला घेऊन आतील विद्यार्थ्यांना प्रथम तातडीने बाहेर काढले. त्यांना सुरक्षित जागी उभे केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.

अग्निशमक दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. या आगीत धुराचा लोळ परिसरात पसरला होता. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. स्कूल बसला आग लागल्याची माहिती मिळताच खारघर पोलिसांचे पथक, वाहतूक शाखेचे पथक व पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपली मुले सुखरूप असल्याचे पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून पनवेल व नवी मुंबई परिसरात वारंवार होणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button