सोमेश्वरनगर : निंबुतसह चार गावात ढगफुटी सदृश; अनेक घरात पाणी, शेतीचे नुकसान | पुढारी

सोमेश्वरनगर : निंबुतसह चार गावात ढगफुटी सदृश; अनेक घरात पाणी, शेतीचे नुकसान

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या पश्चिम भागातील निंबुत, गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, फरांदेनगर आदी भागात मंगळवारी(दि.७) रात्री ढगफुटी झाली. पावसामुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस झाल्याने ओढया नाल्याना पूर आले आहेत. निरा रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्याला पावसाचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली पर्यायाने निरा- बारामतीचा संपर्क तुटला आहे.  पावसाचे पाणी घरात शिरल्याने गडदरवाडी येथील म्हसोबावस्ती येथील पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. ऊस, बाजरी व सोयाबीन आणि भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत.

नगर सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे पश्चिम भागात हाहाकार उडाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत. मंगळवारी रात्री सोमेश्वरनगर व नीरा परिसराला मुसळधार पावसाने झोडपू न काढले. नीरा बारामती रस्ता, मोरगाव- सोमेश्वरनगर रस्ता अशा अनेक ठिकाणी ओढ्याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने सातारा नगर महामार्ग बंद झाला आहे. गणपती आगमनानंतर गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागाला कमीअधिक प्रमाणात पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान मुसळधार आणि नंतर ढगफुटी पाऊस झाला.

त्यामुळे सोमेश्वरनगर परीसरातील सर्वच ओढ्यांना पुर आला आहे. निरा, गुळंचे, पिंपरे, पाडेगाव, राख, निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, करंजे, करंजेपुल, वाघळवाडी मुरुम, वाणेवाडी आदी भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला. फरांदेनगर येथे पुराच्या पाण्यात एक जण वाहून जात असताना स्थानिक युवकांनी त्याला वाचविले. निरा रस्त्यावरील जुन्या काळातील छोटे पुल असल्याने या पुलांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. पावसात घराचे व घरातील साहित्यांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई बाबत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान वीर धरणातून निरा नदीत रात्री मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Back to top button