मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या निकालात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पदवी प्रवेशात मोठी चुरस दिसून आली. यामध्ये यंदा 90 प्लस तसेच 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली. यामुळे पदवी प्रवेशाच्या तीन गुणवत्ता याद्या पार पडूनही अनेकजण प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक महाविद्यालयांत अजूनही विद्यार्थी फेर्या मारत आहेत. यामुळे 50 महाविद्यालयांनी या तुकड्यांसाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून समजते.
बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर नामांकित महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्यांना परवानगी देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. यानुसार मुंबईतील महाविद्यालयांतील तुकड्यांसाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016मधील कलम 109 (8)नुसार अशा परिस्थितीत सरकारला जलदगतीने तुकडीला मान्यता देता येणार आहे. यामुळे सध्याची ही परिस्थिती लक्षात घेता राज्यशासनाकडून जलदगतीने मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
येत्या दोन ते तीन दिवसांत या 50 अर्जांना मान्यता मिळेल अशी माहितीही मिळते. तिसर्या यादीच्या अगोदरच झेविअर्स महाविद्यालयाने तुकडी वाढवली आहे. सर्वच अर्ज मान्य झाल्यास त्यांच्या सध्याच्या प्रवेश क्षमतेपेक्षा 20 टक्के अधिक जागा वाढतील अशी शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले का, त्यांच्या जागी प्रवेश मिळेल का यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात फेर्या मारत आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. या महाविद्यालयात जागा वाढल्या तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.