पिंपरखेड येथे एक बिबट्या पिंजऱ्यात; मनुष्यावर हल्ला झालेल्या ठिकाणचे पिंजरे तसेच | पुढारी

पिंपरखेड येथे एक बिबट्या पिंजऱ्यात; मनुष्यावर हल्ला झालेल्या ठिकाणचे पिंजरे तसेच

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: साईनगर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. ३) रात्री अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र जांबूत व पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेल्या घटनास्थळी लावलेले चार पिंजरे अजूनही बिबट्याच्या प्रतिक्षेत असल्याने नरभक्षक बिबटे जेरबंद कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरखेड येथे गेले काही दिवसांपासून एक मोठा बिबट्या व पूर्ण वाढ झालेले दोन बिबटे भक्ष्याच्या शोधात नागरिकांच्या घरासमोर, जनावरांच्या गोठ्यावर वावरत होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. बिबट्याना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी विक्रम पोखरकर यांनी केली होती. वनविभागाने दखल घेत या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या पिंजऱ्यात गेले दोन दिवस भक्ष्य ठेवले जात होते. शनिवारी सायंकाळी भक्ष्य ठेवल्यानंतर एक तासाच्या आतच भक्ष्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.

स्थानिक ग्रामस्थांनी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपाल गणेश पवार, वनरक्षक विशाल चव्हाण, वनरक्षक दहातोंडे, महेंद्र दाते लगेचच घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला दीड ते दोन वर्षे वयाचा असून त्याला शनिवारी रात्रीच माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले, अशी माहिती वनपाल गणेश पवार यांनी दिली. एक बिबट्या अडकला असला तरी अजून दोन बिबटे या परिसरात असल्याने वनविभागाने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी  विशाल दरेकर, रविंद्र पोखरकर, संतोष दाभाडे यांनी केली आहे.

मनुष्यावर हल्ला झाला तेथे अजूनही भीती

जांबूत व पिंपरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनास्थळी एकूण चार पिंजरे लावण्यात आले आहेत. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असून अजूनही पिंजऱ्यात बिबट्या अडकला नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.

Back to top button