कंगना राणावत वरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला! | पुढारी

कंगना राणावत वरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्यातील कारवाई ही योग्यच असल्याचा दावा गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. दरम्यान कंगना राणावत हिच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत.

यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगना रानावत वर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात केली. याची दखल घेत न्यायालयाने कारवाई सुरू केली.

या कारवाई विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन कारवाई रद्द करावी अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहित ढेरे यांच्या समोर आज बुधवारी सुनावणी झाली.यावेळी कंगनाच्यावतीने अ‍ॅड. रियाज सिद्दीकी यांनी दंडाधिकार्‍यांच्या कारवाईला जोरदार आक्षेप घेतला. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी स्वतंत्र चौकशी केलेली नाही.

तर सुरू केलेली कारवाई ही पोलिसांनी केलेल्या चौकशीवर असल्याने नियमबाह्य असल्याचा दावा केला. तर अख्तर यांच्या वतीने अ‍ॅड. जे भारद्वाज यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला. कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या विरोधात केलेली विधाने आक्षेपार्ह आहेत. उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सुनावणी 9 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवत निर्णय राखून ठेवला .

Back to top button