दिशा सालियन हिचा मृत्यू घातपाती नाही | पुढारी

दिशा सालियन हिचा मृत्यू घातपाती नाही

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची प्रसिद्धीप्रमुख राहिलेल्या दिशा सालियन हिचा मृत्यू घातपाताने नव्हे तर इमारतीवरून पडून झाल्याचा अहवाल देत हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल मुंबई पोलिसांनी 6 महिन्यांपूर्वीच सादर केला आहे.

मालवणी पोलिसांचा हा क्‍लोजर रिपोर्ट सादर केल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दुजोरा दिला मात्र याबाबत अधिक तपशील सांगण्यास त्यांनी दिला नाही.

8 जून 2020 रोजी मध्यरात्री दिशा मालवणीतील जनकल्याण नगर, गॅलेक्सी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडली होती. दिशा सालियान हिचा प्रियकर रोहन रॉय व इतर चार मित्र दीप अजमेरा, इंद्रनील वैद्य, रिशा पडवळ आणि हिमांशू शिखरे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप

मालवणी पोलिसांनी रोहनसह इतर चार मित्रांसह दिशाचे वडील सतीश आणि आई वासंती सालियन यांचे जबाब नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दिशाच्या मृत्यूचा संबंध सुशांत सिंग प्रकरणाशी जोडला जावू लागला. दिशावर बलात्कार करून नंतर तिची हत्या झाल्याचा आरोप एका राजकीय नेत्याने केला.

इतकेच नव्हे तर या नेत्याने महाविकास आघाडी सरकारच्या एका विद्यमान मंत्र्यावरही गंभीर आरोप केले होते. या संदर्भातील बातम्यांनी सालियन कुटुंबियांना मानसिक त्रास झाल्याने आरोप करणार्‍या लोकांवर कठोर कारवाईची मागणी दिशाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली होती.

ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र राजकारणात बेफाम आरोप करणारे कुणीही पुरावे घेऊन पोलिसांकडे आले नाही. आरोपांची आतषबाजी आणि त्यानुसार बातम्या मात्र सुरू राहिल्या.

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आतापर्यंत 25 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. त्यात तिची आई वासंती, वडील सतीश सलियन, तिचा प्रियकर रोहन रॉयसह इतर चार मित्र दिप अजमेरा, इंद्रनील वैद्य, रिशा पडवळ, हिमांशू शिखरे आदींचा समावेश आहे. मृत्यूच्या दिवशी दिशाने अंकित या मित्राला शेवटचा कॉल केला होता. त्याचाही जबाब नोंदवण्यात आला होता. तिच्या मोबाईलमधील मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपमधील इतर लोकांशी झालेल्या चॅटची माहिती घेण्यात आली.

दिशाच्या शवविच्छेदन अहवालात ती नग्न अवस्थेत सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, मात्र ते साफ खोटे असल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट होते. पंचनामा करताना मालवणी पोलिसांसह तिचे आई-वडिल तसेच इतर मित्र उपस्थित होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या या दोन वेगवेगळ्या घटना असून त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
मृत्यूपूर्वी दिशा राजकारण्यांसोबत पार्ट्या करत होती, असेही आरोप झाले. मात्र, मृत्यूपूर्वी ती तिच्या प्रियकराकडे राहात होती. त्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार मृत्यूपूर्वी अनेक दिवस तिने घरातच राहणे पसंत केले.

कुठली तरी ऑर्डर आली म्हणून ती डिलिव्हरी घेण्यासाठी एकदाच घराबाहेर आलेली दिसते. अन्यथा त्या दिवसांत ती कुठेही बाहेर गेली नाही. दिशा गर्भवती होती, असाही शोध राजकारण्यांनी लावला. शवविच्छेदन अहवालाने हा शोध खोटा ठरवला आहे.

Back to top button