प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळीला’ साहित्य अकादमी युवा पुरस्कार | पुढारी

प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळीला’ साहित्य अकादमी युवा पुरस्कार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मराठी रंगभूमीवर रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या प्राजक्त देशमुख या युवा नाटककारांच्या देवबाभळी या (पुस्तकाला) नाटकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यवर्तुळात असलेली उदासीची छटा काहीशी दूर झाली आहे.

साहित्य अकादमीतर्फे 35 वर्षाच्या आतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. 50 हजारांचा धनादेश, ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठीबरोबरच बंगालीतील युवा साहित्यिक श्याम बंदोपाध्याय यांच्या पुराणपुरुष या कांदबरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी साहित्याच्या पुरस्कारासाठी निवड समितीत ज्येष्ठ लेखिका आशा बगे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा समावेश होता.

नाटकाला साहित्य वाङ्मय दर्जा मिळावा

देवबाभळी नाटक अनेक दिग्गजांनी गौरविले आहे. या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र या पुरस्कारामुळे वाङ्मयाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे. नाटक हा परावलंबी कलाप्रकार आहे. त्यामुळे मी जेव्हा नाटक लिहितो तेव्हा ते कुणी तरी सादर करावं हे मनात असतं.

नाटकांच्या पुस्तकांचाही साहित्य आणि वाङ्मय प्रवाहात गणना व्हावी, अशी अपेक्षा साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक – दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली. नाटकाला मिळालेल्या या पुरस्काराने ही बाब अधोरेखित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्राजक्त देशमुख यांचा अल्प परिचय

* 2005 पासून मराठी रंगभूमीवर अभिनेता, लेखक -दिग्दर्शक

* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा – कमलाकर सारंग पुरस्कार

* अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेचा कै. महादेव गवाण उत्कृष्ट नाटककार – रंगसंहिता पुरस्कार

* संगीत देवबाभळी नाटकासाठी – राम गणेश गडकरी पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार

* इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार

* एकादशावतार, बुद्रुकवाडीचा मारुती बाटला – एकांकिकांना विविध पुरस्कार

* समांतर रंगभूमीसाठी लेखन आणि राज्यस्तरीय पुरस्कार -एकादशावतार, रेनमेकर, दो बजनिए, मुन विदाऊट स्काय, संगीत अफ्रू, 12 किमी इत्यादी

* दिग्दर्शनसाठी पुरस्कार – समथिंग ग्रे, मिडनाईट शो, ब्लडी पेजेस, पाणीपुरी, रास्कल्स

* मराठी चित्रपट – गोदावरी- कथा पटकथा- संवाद लेखन

* लघुपट लेखन – दिग्दर्शन – वारीवर आधारित – इन सर्च ऑफ विठ्ठल

Back to top button