लग्नाचा ऑनलाईन बार! नवरी भारतात, नवरदेव अमेरिकेत अन् शुभलग्न सावधान | पुढारी

लग्नाचा ऑनलाईन बार! नवरी भारतात, नवरदेव अमेरिकेत अन् शुभलग्न सावधान

चेन्नई; वृत्तसंस्था : नवरी भारतात आणि नवरदेव अमेरिकेत, तरीही दोघांचे लग्न लागले. ऑनलाईन बार उडाला. ही कथा नाही, खरेच असे घडले आहे आणि तेही हायकोर्टाच्या परवानगीने! हे प्रकरण तामिळनाडूतील कन्याकुमारीचे आहे. निकाल आहे मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचा…

व्हर्च्युअल लग्नाची संकल्पना कुणालाही आश्चर्यजनक वाटेल; पण भारतातील कायद्याची त्याला परवानगी आहे. पण फक्त ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’अंतर्गत (विशेष विवाह कायदा) होणार्‍या विवाहांना.

नवरीची हायकोर्टात धाव

राहुलशी ऑनलाईन लग्न लावण्यासाठी सुदर्शिनीने हायकोर्टाचे दार ठोठावले. न्यायमूर्ती स्वामिनाथन यांनी ऑनलाईन लग्नाला परवानगी दिली. विशेष विवाह कायद्याच्या कलम 12 चा आधार घेऊन व्हिडीओ कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून लग्नाचा बार उडविला जाऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले अन् लगोलग राहुल-सुदर्शिनीचे शुभमंगल झाले!

प्रकरण काय?

वासमी सुदर्शिनी हिचे भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेतील राहुल मधूवर प्रेम जडले. लग्नासाठी राहुल भारतात आला. दोघांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत मनावलकुरिची येथील उपनिबंधकांकडे संयुक्त अर्ज सादर केला. नोटीस प्रकाशित होताच राहुल याच्या पित्याने हरकत घेतली. तीस दिवसांची मुदत उलटल्यानंतर दुसर्‍या दिवशी राहुल-सुदर्शिनी हजर झाले. पण काही कारणांनी उपनिबंधक लग्न लावू शकले नाहीत. व्हिसाच्या अडचणींमुळे राहुलला लगेच अमेरिकेत परतावे लागले.

निकालात काय?

  • विशेष विवाह कायदा दोन्ही पक्षकारांना माध्यम म्हणून कुठलाही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देतो.
  • अट ही की, नवरीसह नवरदेव आणि 3 साक्षीदार ऑनलाईन, व्हर्च्युअली एकत्रित आले पाहिजेत.
  • कायद्याने आधुनिक तंत्रज्ञानासोबत आपली पावले टाकून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
  • विवाह प्रमाणपत्र पुस्तिकेत नवरदेव किंवा नवरीची सही नंतर सोयीनुसार कधीही घेतली जाऊ शकते.

हनाफी मुस्लिम, सिंगापूरचा दाखला

  • हायकोर्टाने निकालात सिंगापूर या देशाचा तसेच पाकिस्तानातील हनाफी मुस्लिम समुदायाचा दाखल दिला. पाकमध्ये हनाफी मुस्लिमांना ऑनलाईन निकाहची परवानगी आहे.
  • सिंगापुरात कोरोनामुळे विवाहासाठी नवा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार विवाहयोग्य जोडप्यास ऑनलाईन लग्न, नोंदणी, कायदेशीर घोषणेची परवानगी आहे.

Back to top button