Draupadi Murmu : आदिवासी पाडा ते राष्ट्रपती भवन…  द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय प्रवास | पुढारी

Draupadi Murmu : आदिवासी पाडा ते राष्ट्रपती भवन...  द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क :  द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. २५ जूलै रोजी त्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. क्लर्क ते भारताच्या राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊया भारताच्या राष्ट्रपती आणि भारताच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu)  यांच्या विषयी.

भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वतीने राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्‍हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्‍या नावाची घाेषणा करण्‍यात आली. विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. फक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि त्यांच्या गटातील पक्षांनीच नाही तर त्यांना विरोधी पक्षांनीसुद्धा जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 

Draupadi Murmu

Draupadi Murmu :  पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्‍ट्रपतीपदासाठी २० नावांची चर्चा सुरू होती. अखेर ओडिसाच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. यापूर्वीही म्हणजे २०१७ मध्‍ये त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्‍याचवेळी राष्‍ट्रपतीपदासाठी त्‍यांच्‍या नावाची चर्चा झाली हाेती. मात्र, त्‍यावेळी  रामनाथ कोविंद यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब झाले.

राष्ट्रपती पदासाठी सोमवारी  (१८ जुलै २०२२)  देशभरात मतदान झाले. आज (२१ जुलै) या निवडणुकीचा निकाल लागला. द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मते (मूल्य ५,७७,७७७) तर त्यांच्या विरोधात उभे असणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना १०५८ मते (मूल्य २,६२,०६२) मते पडली. या विजयाने मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.  भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील निवडून आल्या होत्या. 

Draupadi Murmu : संथाल जमातीत जन्म

द्रौपदी मुर्मू यांचा आजपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात २० जून १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील बिरंची नारायण टुडू हे संथाल आदिवासी जमातीचे तालुका प्रमुख होते. आजोबाही तालुका प्रमुख होते. १९७९ मध्ये भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठातून त्यांनी कला (Arts) शाखेतून पदवी घेतली.  

पती व दोन्ही मुलांचा मृत्यू

द्रौपदी टुडू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी  झाला आणि त्या द्रौपदी टुडूच्या द्रौपदी मुर्मू झाल्या. द्रौपदी व श्याम चरण मुर्मू यांना दोन मुले  व एक मुलगी झाली. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांचे पती कालांतराने दोन्ही मुलांचा मृत्‍यू झाला. द्रौपदी यांना एका पाठोपाठ एक तीन धक्के बसले. पण द्रौपदी या खचल्या नाहीत त्या मोठ्या धीराने उभ्या राहिल्या.

घर आणि मुलीच्या शिक्षणासाठी शिक्षिकेची नोकरी

पती व मुलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी द्रौपदी मुर्मू यांच्यावर पडली. घर सांभाळण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी शिक्षिकेची नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी ओडिसा पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक(लिपीक) पदाची नोकरी केली. नोकरीच्या पैशातून घरखर्च आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले. मुलगी ईति हीने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेत नोकरी सुरू केली. नंतर ईतिचा विवाह झारखंड येथील गणेश यांच्याशी झाला.
Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू आपल्या मुलीसह

राजकीय प्रवास : नगरसेविका ते राष्ट्रपती

द्रौपदी यांचा कौटुंबिक संघर्ष जसा प्रेरणादायी आहे. तसाच त्यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. आदिवासी पाडा ते राष्ट्रपती भवन हा त्यांचा प्रवास हा संघर्षमय असा आदर्शवत राहिला आहे. द्रौपदी यांचा राजकीय प्रवास हा नगरसेविका पदापासून सुरू झाला. १९९७ साली त्यांनी रायरंगपूरच्या नगर पंचायतच्या नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. यानंतर त्या भाजपच्‍या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. त्यानंतर त्यांनी २००० आणि २००९ मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ (नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि ओ.बी.पी. युती सरकारच्या काळात) पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि ओ.बी.पी. युती सरकारच्या काळात मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री झाल्या. मे २०१५ मध्ये द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल झाल्या. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. द्रौपदी यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार’ म्हणून नीलकंठ पुरस्काराने गौरविले.
 Draupadi Murmu

ओडिसा राज्यातील दुसऱ्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत त्याच बरोबर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. (पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील) त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती बनणाऱ्या ओडिशातील दुसऱ्या व्यक्ती असतील. द्रौपदी मुर्मू यांच्‍या आधी ओडिशाचे वराहगिरी वेंकट गिरी (व्ही.व्ही. गिरी) देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते.  (कार्यकाळ- ३ मे १९६९ ते २० जूलै १९६९)

Draupadi Murmu : 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ

देशाचे सहावे राष्ट्रपती नीलम रेड्डी यांनी २५ जुलैला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासून, प्रत्येक वेळी २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती कार्यकाळ सांभाळतात. द्रौपदी मुर्मू याही २५ जुलै रोजी भारताच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २५ जुलैला संपणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button