इंदापूर : गुटख्यासह ९३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

इंदापूर : गुटख्यासह ९३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर पोलिसांनी शनिवारी (दि. १६) केलेल्या कारवाईत ९३ लाख २३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये तब्बल ६८ लाख २३ हजार ९२० रुपये किमतीचा गुटखा आहे. दरम्यान इंदापूर पोलीसांनी आत्तापर्यंत सात कारवायांमध्ये २ कोटी ८६ लाख ३ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री ११ वाजता सरडेवाडी टोल नाका परिसरात नाकाबंदी केली होती. या दरम्यान कर्नाटक पासिंगंचा ट्रक पुण्याच्या दिशेने गुटखा घेऊन निघाला होता.

पोलिसांनी हा ट्रक मोठ्या शिताफिने पकडला. या कारवाईत १६७ गोण्यात मानवी आरोग्यास घातक असलेला व विक्रीस बंदी असलेला ६८ लाख २३ हजार ९२० रुपये किमतीचा गुटखा व २५ लाख रुपये किमतींचा ट्रक (केए २८ बी ९८३१) असा एकूण ९३ लाख २३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी ट्रक चालकास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. ट्रक चालक व मालकाविरुध्द अन्न व सुरक्षा अधिनियम तसेच भारतीय कलम ३२८ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, काशिनाथ नागराळे, जगदीश चौधर, मुहंम्मद अली मड्डी, महेश पवार, बापू मोहिते, लक्ष्मण सुर्यवंशी, सुनिल नगरे, दिनेश चोरमले, सुरज पोटफोडे, अनिल शेवाळे आदींनी केली आहे.

फोटो :

Back to top button