Anaconda : अॅमेझॉनमध्ये आढळला २६ फूट लांबीचा अॅनाकोंडा
कॅनबेरा : जगातील सर्वात लांब सर्प म्हणजे अॅनाकोंडा. ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या सदाहरित जंगलात दलदलीमध्ये हे भयावह अजगर असतात. हिरवा अॅनाकोंडा हा त्यामध्ये अधिक कुतुहल निर्माण करणारा सर्प आहे. आता याठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तब्बल 26 फूट लांबीचा अनाकोंडा शोधला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीतील प्रा. ब्रायन जी. फ्राय यांनी सांगितले की हा अॅनाकोंडा म्हणजे ग्रीन अॅनाकोंडाची वेगळी, नवी प्रजातीच आहे. या दोन्ही सर्पांमधील जनुकीय संरचना वेगवेगळी आहे. सुमारे एक कोटी वर्षांपूर्वी या दोन प्रजाती वेगळ्या झाल्या होत्या.
ग्रीन अॅनाकोंडा हा जगातील सर्वात वजनदार व लांब साप आहे. दक्षिण अमेरिकेतील नद्यांमध्ये हा सर्प आढळतो. वेगवान हालचाली आणि मोठ्या आकाराच्या प्राण्यांना विळखा घालून त्यांना मारणे व गिळंकृत करणे यासाठी हा सर्प ओळखला जातो. अॅनाकोंडाच्या चार प्रजाती आतापर्यंत ज्ञात होत्या. त्यामध्ये हिरव्या अॅनाकोंडाचाही समावेश होतो.
सरीसृपांमध्ये हिरवा अॅनाकोंडा अक्षरशः राक्षसी रूपाचाच आहे. त्याचे वजन 250 किलोंपेक्षा अधिक असू शकते. हा साप पाण्यात राहण्यासाठी अनुकूल शरीर असलेला आहे. त्याचे नाक आणि डोळे डोक्याच्या वरील भागात असतात जेणेकरून ते पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहू शकतील. त्यांचे इतर शरीर पाण्याखाली राहते. हिरव्या रंगाच्या या अॅनाकोंडाच्या शरीरावर काळे ठिपके असतात. दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन आणि ओरिनोको खोर्यातील पाणथळ जागीत हे सर्प असतात.