भाजप-मनसेची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

MNS Vs BJP
MNS Vs BJP
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर नाहीत. ते खरे 24 कॅरेट शिवसैनिक आहेत आणि तेच शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून सत्तास्थापनेबाबत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे सांगत भाजप अजूनही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेचीही सोमवारी बैठक झाली. त्यांनीही 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर टीमची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी झाली. या बैठकीला फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील, त्याच्यावर आमची नजर असणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत त्यासंदर्भात वेळोवेळी उचित निर्णय घेण्यात येईल, असेही या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विश्‍वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची आज तरी गरज वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बंडखोर मानतच नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचारच ते पुढे घेऊन चालले आहेत. ते 24 कॅरेट खरे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पुढच्या काही दिवसांत जर कोणते प्रस्ताव आले तर आम्ही त्यावर विचार करू, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बुधवारपर्यंत मुंबईत या : भाजप आमदारांना सूचना
शिवसेनेतील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेली भाजप आता सक्रिय झाली आहे. भाजप आमदारांना बुधवारपर्यंत मुंबई येण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिंदे यांचा गट भाजपसोबत येणार हे स्पष्ट आहे. या गटाला अपात्रतेच्या कारवाईपासून सर्वोच्च न्यायालयाने तूर्त संरक्षण दिले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदारांना अलर्ट देण्यात आला आहे.

मनसेचे सूचक मौन
राज्यातील राजकीय परिस्थितीवर मनसेच्या नेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार का, या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट बोलणे टाळले होते मात्र या मुद्द्याचे खंडनही केले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news