राजीनामा देऊ नका, परिस्थितीतून मार्ग काढा ; शरद पवार
![Mumbai Police issues notice to workers of Uddhav Thackeray faction and NCP](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/06/23083229/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-.jpg)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : घाईघाईत राजीनामा देऊ नका. मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन दिला. या संकटात आणि कसोटीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत आहे, असा विश्वासही पवार यांनी त्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी थेट संवाद साधल्यानंतर काही वेळातच पवार उद्धव यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. उद्धव कोरोनाबाधित झाल्याने सुरक्षित अंतर ठेवून ही भेट झाली.सरकारवर मोठे संकट आले असले, तरी यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. हा तुमचा पक्षांतर्गत कलह असल्याने जो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख म्हणून घ्या; पण संयमाने आणि परिस्थितीनुसार पावले टाका, असेही शरद पवार यांनी ठाकरे यांना सांगितले.