23 आयएएस अधिकार्‍यांनी दडवली संपत्तीची माहिती

23 आयएएस अधिकार्‍यांनी दडवली संपत्तीची माहिती

सुनील कच्छवे, छत्रपती संभाजीनगर : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेची माहिती दरवर्षी शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील 23 आयएएस अधिकार्‍यांनी यंदा अशी माहिती देणे टाळले आहे. सध्या राज्यात एकूण 315 आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. यातील 292 अधिकार्‍यांनीच त्यांच्या संपत्तीविषयीचे घोषणापत्र सादर केले. घोषणापत्रानुसार राज्यातील बहुतेक अधिकार्‍यांकडे महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेरही फ्लॅट, बागायती शेती, भूखंड अशी स्थावर मालमत्ता आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक तथा प्रशिक्षण विभागाच्या वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे.

नियमानुसार सर्व आयएएस अधिकार्‍यांना मार्चपूर्वी केंद्र सरकारच्या कार्मिक तथा प्रशिक्षण खात्याकडे घोषणापत्र सादर करावे लागते. आपली स्थावर मालमत्ता, त्याचे सध्याचे बाजारमूल्य, त्यांच्याकडे ही मालमत्ता कोणत्या माध्यमातून हस्तांतरित झाली आदींबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मार्चअखेरपर्यंत राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह 292 जणांनी असे घोषणापत्र सादर केले आहे. मनुकुमार श्रीवास्तव हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतरच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत असलेले मनौज सौनिक आणि सुजाता सौनिक या पती-पत्नीनही आपल्या मालमत्तेचे घोषणापत्र सादर केलेले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रात आणि बिहारमध्येही मालमत्ता आहे. राज्यातील 23 अधिकार्‍यांनी मात्र हे घोषणापत्र शासनाकडे सादर केलेले नाही.

मुख्य सचिवांकडे किती मालमत्ता ?

राज्याचे सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. पहिला फ्लॅट मुंबई उपनगरातील अंबिवली येथे पाटलीपुत्र हाऊसिंग सोसायटीत आहे. तो त्यांनी 2002 मध्ये घेतलेला आहे. तर दुसरा फ्लॅट नवी मुंबईतील नेरुळ येथे वनश्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत आहे. तो त्यांनी 2006 साली खरेदी केलेला आहे. वरील दोन्ही फ्लॅट मनुकुमार श्रीवास्तव आणि
त्यांची पत्नी अर्चना या दोघांच्या नावे आहेत.

वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनौज सौनिक यांच्याकडे बिहारसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात वारसाहक्काने आलेली चार एकर 26 गुंठे बागायती शेती आहे. नवीन मुंबईत वनश्री को-ऑपरेटिव्ह हाऊससिंग सोसायटीत एक फ्लॅट आहे. मुंबईतीलच लोअर परेल भागात कॅस ग्रँड टॉवरमध्येही त्यांचा एक फ्लॅट आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तुंगार्ली येथे 860 चौरस मीटरचा भूखंड आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात विरानी येथे 1.2 हेक्टर कोरडवाहू जमीन आहे. तसेच मुंबईतील घाटकोपर ईस्ट भागात एक फ्लॅट आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावे एकूण तीन ठिकाणी मालमत्ता आहेत. यामध्ये बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात 1.59 एकर बागायती जमीन, मुंबई अंधेरी येथे पाटलीपुत्र हाऊसिंग सोसायटीत एक फ्लॅट आणि घाटकोपर (पूर्व) येथे एक फ्लॅट आहे. आयएएस अधिकार्‍यांच्या पाटलीपुत्र हाऊसिंग सोसायटीत त्यांना शासनाकडून हा फ्लॅट अलॉट झालेला आहे.

संपत्तीचे घोषणापत्र सादर न करणारे अधिकारी

विमलेंद्र शरण, संजय अग्रवाल, संजय खंदारे, संजीव जैस्वाल, रणजितसिंह देओल, संजीव कुमार, ए. आर. काळे, कांतीलाल उमप, मधुकर अर्दड, दौलत देसाई, जी. श्रीकांत, किरण कुलकर्णी, के. व्ही. जाधव, राजीव निवटकर, भाऊसाहेब दांगडे, प्रदीपकुमार डांगे, शिवानंद टाकसाळे, वर्षा ठाकूर, विनय मून, अजित पवार, के. बी. खैरे, नीलेश गटणे आणि विकास मिना यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news