सिंधुदुर्ग : मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्‍तीवर प्राणघातक हल्ला

जखमी जगदीश डंबे. सर्‍या छायाचित्रात हल्ल्यात वापरण्यात आलेला सुरा.
जखमी जगदीश डंबे. सर्‍या छायाचित्रात हल्ल्यात वापरण्यात आलेला सुरा.
Published on
Updated on

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे तिठा ओव्हरब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश सदाशिव डंबे (वय 53, रा. कासार्डे-जांभळगाव तिठा) हे मॉर्निंग वॉक करत असताना मोटारसायकलवरून पाठलाग करत तीन अज्ञातांनी डंबे यांच्याकडे रस्ता विचारण्याचा बहाणा करत सुर्‍याचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी हल्लेखोरांनी डंबे यांच्या नाकावर ठोशाने मारहाण करत त्यांच्यावर चाकू उगारला. मात्र, प्रसंगावधान ओळखत डंबे यांनी तो चाकू हिसकावून घेऊन पुलाखाली सर्व्हिस रोडवर फेकला. या झटापटीत डंबे जखमी झाले. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील सुमारे 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करून कणकवलीच्या दिशेने पोबारा केला. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास कासार्डे ओव्हरब्रीजवर ही घटना घडली.

कासार्डे तिठा ओव्हरब्रीजच्या नजीक राहणारे जगदीश डंबे हे गुरुवारी पहाटे 5 वा. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले. ते सर्व्हीस रोडवून पुलावर चढत महामार्गाच्या कासार्डे -खारेपाटण लेनवरुन चालत असताना एक काळ्या रंगाची मोटारसायकल त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्यावर तिघे स्वार होते. एकजण मोटारसायकलवर बसून होता. दोघे खाली उतरले आणि श्री. डंबे यांना आम्हाला मालवणला जायचे आहे, तर कसे जायचे? अशी विचारणा केली. त्यांनी हातातील सुर्‍याचा धाक दाखवत श्री. डंबे यांच्याकडे थेट पैशांची मागणी केली. मात्र समोरील व्यक्‍ती मॉर्निग वॉकला जात असल्याने त्याच्या खिशात पैसे नसल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोरांंनी श्री.डंबे यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगठी बोटात घट्ट बसलेली असल्याने ती निघत नाही, हे पाहून हल्लेखोरांनी सुरा दाखवत जीवे मारण्याची धमकी देत श्री. डंबे यांच्याशी झटापट केली. त्यातील एकाने श्री. डंबे यांच्या नाकावर हाताचा जोरदार ठोशा दिला. त्यावेळी चष्म्याची काच नाकाला लागून ते रक्‍तबंबाळ झाले. श्री. डंबे यांनी त्याही स्थितीत प्रतिकार करत हल्लेखोरांकडून सुरा काढून घेतला. मात्र मूठ त्यांच्या हातात राहिली. तो सूरा श्री. डंबे यांनी पुलावरून सर्व्हीस रोडवर खाली फेकून दिला. यावेळी श्री. डंबे यांनी आरडाओरड केल्याने जवळच सर्व्हिस रोडवर असणारे डॉ.अरविंद कुडतरकर व सहकार्‍यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. हे पाहिल्यावर चोरट्यांनी श्री. डंबे यांच्या खिशातील 15 हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून घेत पळ काढला.दरम्यान या चोरट्यांना पकडण्याचा काहींनी प्रयत्न केला. मात्र, चोरटे कणकवलीच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले. हल्लेखोर घटनेपूर्वी काही काळ विरूद्ध दिशेने सर्व्हिस रोडच्या ड्रेनेज लाईनवर असलेल्या फूटपाथवर बसून होते. त्यांना डंबे यांनीही पाहिले होते. यानंतरच त्यांनी हा कट करून त्याच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला केला.

या घटनेची माहिती परिसरात समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत श्री. डंबे याची विचारपूस करत याची खबर पोलिसांना दिली. घाबरलेले श्री. डंबे यांचा बीपीही वाढला असल्याने त्यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करत प्राथमिक उपचार करून प्रकृती स्थिर असल्याने त्याना उपचार करून घरी पाठविण्यात आले. दरम्यान, कणकवली पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू केला. पहाटे झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सुदैवानेच जीवितहानी टळली आहे. दोन महिन्यापूर्वी कणकवलीत उड्डाणपुलावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. चोरटे 20 ते 25 वयोगटातील असून जिल्ह्यातीलच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. या तीन अज्ञातांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news