भारत-चीन सीमेवर शांतता राहणार

भारत-चीन सीमेवर शांतता राहणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत-चीनमधील लष्करी अधिकार्‍यांमधील 20 व्या उच्चस्तरीय बैठकीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली.

गलवान खोर्‍यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील लष्करातील कमांडर स्तरावरील अधिकार्‍यांची 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. याआधीही अशा प्रकारच्या उच्चस्तरीय बैठका आयोजित करून वास्तव नियंत्रण रेषेचे पावित्र्य आणि शांतता राखण्याबाबत चर्चा झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्येही सीमेवर शांतता राखण्याबाबत दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी सहमती दर्शविली. देपसांग, डेमचोकमधील चिनी सैनिक मागे घेण्याची आग्रही भूमिका भारतीय अधिकार्‍यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांतील अधिकार्‍यांमध्ये खुलेपणाने आणि रचनात्मक चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारताच्या वतीने लेफ्टनंट जनरल राशीम बाली, तर चीनच्या वतीने शिनजियाँग यांच्या नेतृत्वाखालील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.

1967 : सिक्कीम-तिबेट सीमेवरील चो ला या?ठिकाणी दोन्ही देशांतील सैनिक आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताचे 80 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 400 सैनिक मृत्युमुखी पडले होते.

1975 : अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे आसाम रायफल्सच्या जवानांवर चिनी लष्कराने हल्ला केला होता. यामध्ये चार जवान शहीद झाले होते.

1987 : तवांगच्या उत्तरेकडील चू भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात आल्यामुळे अनर्थ टळला होता.

2017 : डोकलामा या ठिकाणी चीनने रस्त्याचे काम सुरू केले होते. भारतीय जवानांनी चीनच्या या कुरापती थांबविल्यामुळे त्यावेळी दोन्ही देशांत 75 दिवस तणाव निर्माण झाला होता.

2020 : गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 38 सैनिक मृत्युमुखी पडले होते.

2022 : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील भारतीय पोस्ट कार्यालय चिनी सैनिकांनी हटविण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले होतेे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news