निखतचा गोल्डन पंच!

निखतचा गोल्डन पंच!
निखतचा गोल्डन पंच!

निखतचा गोल्डन पंच! – सुनील डोळे 

'निखत' हा एक सूफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोने! नावाप्रमाणेच निखतने आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोहोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.

भारताच्या क्रीडा इतिहासात 19 मे 2022 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्याचे कारण निखत झरीनची सुवर्णमय कामगिरी. तुर्कस्तानच्या इस्तंबूल नगरीत तिने या दिवशी बॉक्सिंगचे विश्‍वविजेतेपद स्वतःच्या नावावर केले आणि इतिहास रचला. जिगरबाज, वादळी आणि काहीशी वादग्रस्त या तीनच शब्दांत निखतचे वर्णन करता येईल. 52 किलो वर्गात तिने थायलंडच्या जितपोंग जुटामेन्सला अस्मान दाखवताच संपूर्ण देशात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. या यशाची खासियत अशी की, निखतने अंतिम फेरीत जुटामेन्सला 5-0 अशा सणसणीत फरकाने धूळ चारली. तेलंगणच्या या उमद्या कन्येने सार्‍या भारतवर्षाला खूश करून टाकले.महिला विश्‍वविजेतेपदाचा गौरव प्राप्‍त केलेली निखत ही भारताची पाचवी बॉक्सर होय. या आधी मेरी कोमने तब्बल अर्धा डझन वेळा हा बहुमान पटकावला आहे. त्याखेरीज सरिता देवी, लेखा के. सी. आणि जेनी आर. एल. या अन्य महिला बॉक्सर्सनी विश्‍वविजेतेपद संपादले आहे.

तेराव्या वर्षीच रिंगणात

14 जून 1996 रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे निखतचा जन्म झाला. या राज्याला बॉक्सिंगची फारशी पार्श्‍वभूमी नाही. निखतचे वडील मोहम्मद जमील फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचे. निखतला एकूण चार बहिणी. त्यातील दोघी डॉक्टर, तर सर्वात धाकटी बॅडमिंटनमध्ये आपले नशीब आजमावत आहे. निखत ही चार बहिणींपैकी चौथी. मोहम्मद जमील यांना सातत्याने असे वाटत होते की, आपल्या एकातरी मुलीने क्रीडा क्षेत्रात नावलौकिक संपादन करावा. त्यासाठी त्यांनी निखतची निवड केली. मात्र, निखतने सर्वसाधारपणे महिला ज्या खेळाकडे फारशा वळत नाहीत अशा 'बॉक्सिंग'ची निवड आपल्या कारकिर्दीसाठी करताच, घरातील सर्वांच्या भुवया उंचावल्या. वडील मोहम्मद यांनी कसलेही आढेवेढे न घेता आपल्या कन्येच्या या निर्णयाला लगेच पाठिंबा दर्शवला. वास्तवात त्यांना असे वाटत होते की, निखतने धावपटू म्हणून नाव मिळवावे. तथापि, तिने बॉक्सिंगची निवड केल्याचे समजताच, निखतची आई परवीन सुलताना यांनी तर सुरुवातीला घरच डोक्यावर घेतले! त्यांची समस्या वेगळीच होती. 'अगं, तू जर बॉक्सर बनलीस तर तुला पत्नी म्हणून कोणीही स्वीकारणार नाही.' असे त्यांनी आपल्या लेकीला बजावले. पण व्यर्थ! निखतला किशोरवयातच बॉक्सिंगचे विश्‍वविजेतेपद खुणावू लागले होते. आता तिला पाठिंबा द्यायला तिचे काका शमसुद्दीन हेही सज्ज झाले. कारण, त्यांची दोन्ही मुले एतेशामुद्दीन आणि इतिशामुद्दीन बॉक्सिंगचे रिंगण गाजवू लागली होते. त्यामुळे काका हेच निखतचे प्रेरणास्थान बनले. त्यांनी निखतला सर्वतोपरी साहाय्य केले आणि वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी निखत 'जागतिक युवा बॉक्सिंग विजेती' ठरली. त्यानंतर तिची ठोसेबाजीची मालिका सुरूच राहिली. यशाच्या पायर्‍या ती चढत गेली. हा वेग अफलातून होता. तसे पाहिले, तर तिला उशिरानेच विश्‍वविजेतेपद मिळाले. याचे मुख्य कारण म्हणजे 2017 साली तिच्या खांद्याला झालेली दुखापत. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता तिची कारकीर्द संपणार की काय, असे वाटू लागले होते. मात्र, निखत पुन्हा पूर्ण ताकदीनिशी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली आणि पाहता पाहता तिने जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातलीसुद्धा! 'निखतचे हे यश देशातील सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल!' अशी भावना तिचे वडील मोहम्मद जमील यांनी व्यक्‍त केली. ते खरेच आहे. निखत ही मुस्लिम असल्यामुळे ती हाफ पँट परिधान करून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर सुरुवातीच्या काळात नातेवाईक आणि निजामाबादमधील मोहल्ल्यांतून जमील कुटुंबाला टोमणे सहन करावे लागले होते. तथापि, त्यांनी निग्रहाने त्याकडे दुर्लक्ष केले. निखतमध्ये असलेल्या अपार क्षमतेची जाणीव कुटुंबातील सर्वच सदस्यांनी झाली होती. त्यामुळे त्यांनी निखतला सातत्याने प्रोत्साहन दिले. परिणामी, निखतलाही हुरूप आला. ती एकेक पायरी सर करत गेली. अपार परिश्रम, तीव्र इच्छाशक्‍ती आणि कणखर मनोबल या त्रिसूत्रीच्या बळावर निखतने हे निर्भेळ यश खेचून आणले. निखतच्या यशात तिचे प्रशिक्षक आणि गुरू द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्ही. राव यांचा मोठा वाटा आहे. निखतमधील सुप्‍तगुण त्यांनी वेळीच ताडले आणि या कच्च्या हिर्‍यावर असे पैलू पाडले की, नंतरच्या काळात या हिर्‍याच्या तेजाने सार्‍या जगाचे डोळे दिपले..!

वादळी आणि सडेतोड

ही गोष्ट आहे टोकियो ऑलिम्पिकच्या चाचणी स्पर्धेची. त्यावेळी मेरी कोमने निखत झरीनचा 9-1 अशा फरकाने लीलया पाडाव केला. मात्र, नंतर अचानकपणे विश्‍व बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरीचा समावेश 51 किलो गटात करण्यात आला. त्यावेळी कोणताही चाचणीचा निकष लावला गेला नाही. याला निखतने तीव्र आक्षेप घेतला. केवळ आधीच्या यशामुळे मेरीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप निखतने केला. एवढेच नव्हे, तर तिनेे तेव्हाचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना आपली बाजू मांडणारे सविस्तर पत्रदेखील लिहिले होते. निखतच्या या लेटरबाँबने एकच खळबळ उडवून दिली. अनेक दिवस माध्यमात या वादाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अखेर, कोणाच्याही बाबतीत उजवे-डावे केले जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिजिजू यांना द्यावा लागला. दुसरीकडे, मेरी कोमसुद्धा हट्टाला पेटली. कोण ही निखत? असा उर्मट सवाल मेरीने माध्यमांसमोर केला तेव्हा निखत मनातून दुखावली गेली. हे शाब्दिक युद्ध एवढे टिपेला पोहोचले की, जेव्हा निखत आणि मेरी यांची लढत झाली तेव्हा मेरीने निखतशी हस्तांदोलन करण्याचे सौजन्यसुद्धा दाखवले नाही. त्याबद्दल मेरीवर तेव्हा टीका झाली होती. हा जबरदस्त अपमान निखतच्या मनात घर करून राहिला होता. आता ती जिद्दीला पेटली. रोज तासन् सात सराव करू लागली. इस्तंबूलमध्ये होणारी स्पर्धा जवळ येऊ लागली तेव्हाच तिला विश्‍वविजेतेपद खुणावू लागले. झालेही तसेच. पहिल्या फेरीपासून निखतने एवढा धडाकेबाज खेळ केला की, तिच्या जबरदस्त ठोशांपुढे कुठल्याच प्रतिस्पर्ध्याचा निभाव लागला नाही. अंतिम फेरी जवळ आली तसे निखतच्या ठोशांत जणू बारा हत्तींचे बळ आले. आपल्या थाई प्रतिस्पर्धी बॉक्सरला तिने मानच वर करू दिली नाही. पंचांनी तिला विजयी घोषित केले तेव्हाच निखत नावाचे वादळ शांत झाले…

अखेर तिची स्वप्नपूर्ती झाली!

मोठ्या रुबाबात ती मेरी कोमच्या पंगतीत जाऊन बसली. सुवर्णपदक मिळवून झाल्यानंतर आता निखतला तिच्या आवडीच्या बिर्याणीवर ताव मारायचाय. कारण, खेळाडूंसाठी असलेल्या विशेष आहारामुळे गेल्या तीन वर्षांपासून बिर्याणीचे दूर-दर्शन घेऊनच तिला समाधान मानावे लागले आहे. खरे तर, निखतला आयपीएस व्हायचे होते. बी.ए.ची पदवी प्राप्‍त केल्यानंतर हा विषय तिच्या डोक्यात रुंजी घालू लागला. मात्र, नंतर ती बॉक्सिंगचे रिंगण गाजवू लागली आणि पोलिस अधिकारी व्हायचा विचार तिला सोडून द्यावा लागला. एक दिवस आपल्या नावाचीही ट्विटरवर जगभर चर्चा व्हावी, असे स्वप्न तिने पाहिले होते. विश्‍वविजेती झाल्यानंतर तिचे हे स्वप्न वास्तवात अवतरले आणि ती कमालीची सुखावली. 'निखत' हा एक सूफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोने! नावाप्रमाणेच निखतने आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोहोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.

संघर्षमय प्रवास

तसे पाहिले, तर निखतने 2011 मध्येच युवा विश्‍वविजेतेपद संपादले होते. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी तिला तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली. मग 2016 साली फ्लायवेट प्रवर्गात मनीषाला पराभूत करून निखत पहिल्यांदा वरिष्ठ विभागातील चॅम्पियन बनली. यातील योगायोगाची गोष्ट अशी की, याच प्रवर्गात मेरी कोमचा समावेश होता. त्यामुळे निखतची उपेक्षा होत गेली. दरम्यानच्या काळात वरिष्ठ राष्ट्रीय विभागात निखत सातत्याने बहारदार कामगिरी करत राहिली. बेलग्रेडमध्येही तिने पदकाला गवसणी घातली. 2018 साली राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी जेव्हा निखतला डावलले गेले तेव्हा तर ती पार मोडून पडायला आली होती. अशा वेळी वडिलांनी निखतला धीर देत वैफल्याच्या छायेतून बाहेर काढले. त्यामुळे निखतचा आत्मविश्‍वास दुणावला. ती नव्या उमेदीने रिंगणात उतरली आणि पदके मिळवू लागली. आता जेव्हा 'विश्‍वविजेतेपद' संपादले तेव्हा 'मेरी कोमशी असलेला माझा वाद संपलाय,' अशी घोषणाच निखतने ट्विटरवर करून टाकली. 'जुने जाऊ दे मरणालागुनि' या उक्‍तीनुसार झाले गेले विसरून, मेरीसोबतचा आपला जुना फोटो निखतने शेअर केला. त्याखालच्या ओळी मोठ्या अर्थपूर्ण होत्या. निखत म्हणते, 'मेरीसारख्या महान खेळाडूचा आशीर्वाद मिळाल्याखेरीज माझे यश परिपूर्ण होऊ शकत नाही. धन्यवाद मेरी, तुझ्याच प्रेरणेमुळे मी हे यश मिळवू शकले.' त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा निखतच्या कौतुकाचे ट्विट केले तेव्हा तर निखतचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या रात्री मी माझे सुवर्णपदक उशीजवळ ठेवूनच झोपले होते, अशी आठवण निखत सांगते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news