मोहीम : सुटकेचा नि:श्वास

मोहीम : सुटकेचा नि:श्वास
Published on
Updated on

उत्तर काशीतील सिल्क्यारा बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यात अखेर यश आले आणि या दुर्घटनेमुळे गुदरमलेल्या श्वासांनी बर्‍याच काळानंतर मोकळ्या हवेत श्वास घेतला. मजुरांचे नातेवाईक, बचावपथक आणि देशातल्या तमाम जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. अर्थात हे यश लष्करासह अहोरात्र मेहनत घेणार्‍या कर्मचार्‍यांचे, अधिकार्‍यांचे आहे.

संपूर्ण देश दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करत असताना 12 नोव्हेंबर रोजी सिल्क्यारा बोगदा अचानक ढासळला आणि यात 40 हून अधिक कामगार अडकले. सिल्क्यारा बोगदा हा प्रामुख्याने उत्तराखंडच्या चारधाम योजनेचा भाग आहे. या बोगद्यामुळे भाविकांची चारधाम यात्रा आणखी सुलभ आणि वेगवान होणार आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथदरम्यानचा प्रवास या बोगद्यामुळे सुखद होणार आहे. भाविकांचा सुमारे एक तास वेळ वाचणार आहे. भाविकांचा एक तास वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार्‍या कामगारांच्या स्वप्नात बोगद्यात आपण 400 पेक्षा अधिक तास अडकून राहू, असे कधी आले नसेल.

या मजुरांच्या सुटकेसाठी तब्बल 17 दिवसांपासून संपूर्ण देश डोळ्यांत तेल घालून प्रतीक्षा करत होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवता यावे यासाठी त्यांनी देश-विदेशातील आपत्ती तज्ज्ञांचा सल्ला आणि मदतही मागितली. या कठीण कामात बीआरओ, आरोग्य सेवा, ओएनजीसी अशा अनेक संस्थांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे त्या कामगारांचे मनोबल उंचावले.

सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कोसळलेल्या बोगद्याच्या आत एक छिद्र पाडणे, जेणेकरून कामगारांना मदत करण्याबरोबरच बाहेर काढता येईल. त्यासाठी शक्तिशाली 'ऑगर' मशिनचा वापर करण्यात आला. मात्र दुर्दैवाने या यंत्राचे ब्लेड कोसळलेल्या बोगद्याच्या ढिगार्‍यात गाडलेल्या सळ्या आणि खडकांवर आदळून खराब झाले. अखेर हाताच्या सहाय्याने ढिगारा खणून अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला. या संथ आणि कठीण प्रक्रियेला रॅट मायनिंग असे नाव देण्यात आले. याशिवाय विहीर खोदल्याप्रमाणे बोगद्याच्या माथ्यावरून सरळ खाली खोदण्यासाठी ड्रिलिंग मशिनचा वापर करण्यात आला. या पद्धतीतही सुमारे 40 मीटर खोदकाम केल्यावर बोगदा मजबूत करण्यासाठी बनवलेल्या रेबारच्या जाळीमुळे अडथळा येण्याची शक्यता होती.

या दोन्ही पद्धती समजून घेतल्यावर शेवटच्या आणि अत्यंत नाजूक टप्प्यात लष्कराची मदत का घेण्यात आली हे स्पष्ट होते. दुर्गम ठिकाणी खोदल्यानंतर वेल्डिंगद्वारे धातू कापण्याचे कठीण काम करण्यासाठी भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी कोअरच्या मद्रास सॅपर्स युनिटच्या सैनिकांना नियुक्त करण्यात आले. यामागचे कारण म्हणजे हे सैनिक शत्रूने तयार केलेल्या विध्वंसक बोगद्यांची अत्यंत सावधगिरीने सफाई करण्यामध्ये माहीर असतात. सिल्क्याराच्या कोसळलेल्या बोगद्यातील रॅट मायनिंगची प्रक्रिया अत्यंत धोकादायक होती. कारण अरुंद बोगदा खाली पडलेल्या ढिगार्‍यामुळे आणखी रोखला जाऊ शकतो. आपल्या शूर सैनिकांकडून या कार्यात यश मिळण्याची पूर्ण आशा होती.

अंतिम टप्प्यात येण्यापूर्वीच भारतीय हवाई दलाने या आपत्तीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 25-30 टन वजनाचे हेवी ड्रिलिंग मशिन दुर्गम भागात पोहोचवण्याचे काम अत्यंत जटिल होते. कारण या भागात जेसीबी आणि जड रस्तेबांधणी आणि खडक कापण्याची उपकरणे आठवडे किंवा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतरच पोहोचू शकतात, हवाई दलाच्या मदतीशिवाय हे अशक्य ठरते.

उत्तराखंडमधील ताज्या घटनेमध्ये अपघाताच्या ठिकाणी सर्वात जवळची हवाई पट्टी धरसू येथे होती; पण ती अवजड वाहतूक करणार्‍या विमानांसाठी योग्य नव्हती. हवाई दलाची सी-17 आणि सी -130 जे हर्क्युलससारखी विमाने ऑगर मशिनचे भरभक्कम वजन घेऊन तेथे उतरू शकतील की नाही याचे मूल्यांकन हवाई दलाने घाईघाईने पूर्ण केले. यावर्षीच हवाई दलाने सुदानमध्ये अडकलेल्या 121 भारतीयांना अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढत विमान उड्डाण कौशल्यातील आपले कसब सर्वोत्तम असल्याचे दाखवून दिले होते. नाईट व्हिजन गॉगल परिधान करून सुदानमधील सय्यदना या खडबडीत धावपट्टीवर रात्रीच्या वेळी उतरणार्‍या कुशल वैमानिकांसाठी धारासू धावपट्टीही असेच जटिल आव्हान होते; पण हवाई दलाने दोन सी-130 जे हर्क्युलस विमाने आणि सी-17 यांसारख्या जड विमानांसह अशा ठिकाणी उतरून आश्चर्यकारक कामगिरी केली. कारण तेथे जड वस्तू काढण्यासाठी कोणतेही ऑफलोडिंग प्लॅटफॉर्म आणि उपकरणे नाहीत. हवाई दलाचे हेलिकॉप्टरही परिसराची पाहणी करण्यासाठी उपयुक्त ठरले.

सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी 41 रुग्णवाहिका वाहने थांबली असली तरी गरज पडल्यास तातडीने हवाई दलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली होती. हवाई दलाच्या मदतीमुळे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले. आपत्ती व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात लष्कर आणि हवाई दलाच्या साहस, समर्पण आणि कौशल्यावर जनतेचा असणारा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला.

सिल्क्यारा प्रकरणाचा धडा

साधारणतः एक किलोमीटरचा बोगदा 25 किलोमीटरचा रस्ता वाचवतो. बोगद्याऐवजी रस्ता बनवण्याचा विचार केल्यास पर्यावरणाची अधिक हानी होईल. 25 किलोमीटरचा रस्ता बनवायचा झाल्यास त्यासाठी जंगलही कापले जाईल, जेसीबीही चालेल आणि ब्लास्टिंगही होईल. शिवाय तो रस्ता कितपत कायम आहे, हाही मोठा प्रश्न आहे. जेव्हा बोगदा बांधला जातो तेव्हा तो 90 टक्के सुरक्षित राहतो. बोगदा बांधताना वरील जंगले कापली जात नाहीत. पर्यावरणाच्या द़ृष्टिकोनातून बोगदा रस्त्यांपेक्षा सुरक्षित ठरतो. रुद्रप्रयाग आणि केदारनाथ दरम्यान बांधलेल्या बोगद्याचे उदाहरण यासाठी बोलके आहे. तथापि, उत्तर काशीच्या बोगद्याच्या दुर्घटनेला पूर्णपणे बांधकामाचे अपयश म्हणावे लागेल. त्यातून धडा घेत यापुढील काळात बोगद्यातील काम तज्ज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली व्हायला हवे. तसेच बोगदा बांधला जातो, तेव्हा बांधकाम एजन्सी सुरक्षिततेसाठी बाहेर पडण्याचा मार्ग (एस्केप रूट) बनवतातच; पण या बोगद्यामध्ये तो नव्हता. त्यामुळे यापुढील काळात या बोगदा उभारणीतील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. थेट विकासकामांना विरोध करणे हे यावरचे उत्तर असू शकत नाही. कारण डोंगराळ आणि हिमालयीन प्रदेशातील लोकांनाही विकासाची गरज आहे.
भौगोलिकद़ृष्ट्या संवेदनशील असणारा हिमालय आणि तेथील विकासकामे यात समतोल कसा साधता येईल, हा प्रश्न कायम आहे.

अलीकडच्या काळात भूस्खलन होणे, रस्ता खचणे, धरण फुटणे, कालवे वाहून जाणे, दरडी कोसळणे यांसारख्या घटना घडत आहेत. तरीही त्याबाबत पुरेशी जागरुकता दाखविली जात नाही. ही दुर्घटना सखल भागात घडली असती तर एवढ्या अडचणी आल्या नसत्या. मात्र डोंगराळ, पर्वतीय भागात विकास योजना राबविताना सजगता, कुशलता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सिल्क्यारा बोगदा दुर्घटना भविष्यात अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी एक धडा आहे.

– अनिल प्रकाश जोशी, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news