सिडनी : समुद्रात असंख्य प्रकारचे जीव आढळून येतात. या जलीय जीवांमध्ये 'व्हेल' मासे आकाराने फारच मोठे असतात. याच माशांच्या मोठ्या समूहाने किनार्याकडे कूच केले. मोठ्या संख्येने एकाचवेळी आणि तेही किनारी भागात पाहून लोक चकित झाले. पण ज्यावेळी सत्यस्थिती समजली तेव्हा तेच लोक हळहळू लागले.
नुकत्याच घडलेल्या घटनेनुसार अचानक व्हेल माशांचा भला मोठा समूह ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या बीचवर दाखल झाला. यातील माशांची संख्या सुमारे 230 इतकी होती. किनार्यावरील लोकांनी या जलीय जीवांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने यामधील 200 माशांचा मृत्यू झाला. व्हेल माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. किनार्यावर पहुडलेल्या माशांमध्ये कोणती जिवंत आणि कोणती मृत्युमुखी पडली आहे? याचा अंदाज येत नव्हता.
टास्मानियाच्या बीचवर इतक्या मोठ्या संख्येने एकाचवेळी व्हेल मासे येणे, ही बाब पर्यावरण शास्त्रज्ञांसाठीही गूढ ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या जैव संसाधन व पर्यावरण विभागाने सुमारे 230 व्हेल किनार्यावर आल्या होत्या आणि त्यातील 200 हून अधिक मासे मरण पावल्याच्या घटनेची पुष्टी केली. या माशांना वाचविण्यासाठी बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे 500 हून अधिक पायलट व्हेल मासे आले होते. त्यापैकी 100 माशांचा प्राण वाचविण्यात यश मिळाले होते.